​मालेगाव: मालेगाव शहर उपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीचा कणा मोडण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षभरात धडक कारवाईचे सत्र राबवले आहे. साहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑगस्ट २०२५ ते ३ ऑगस्ट २०२६ या वर्षभराच्या कालावधीत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ४७७ छापे टाकत ७५० संशयीतांना गजाआड केले आहे. या कारवायांमध्ये एकूण ३ कोटी ९ लाख ५५ हजार ४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

थेट ‘मकोका’ कारवाई

पोलीस दलातर्फे वर्षभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवायांची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईचा धडाका दिसून येत आहे. शहरातील ड्रग्ज आणि नशेच्या व्यापाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांतर्फे विशेष मोहीम राबवण्यात आली. ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत ३२ कारवायांमध्ये ६३ संशयीतांना अटक करण्यात आली. यामध्ये एमडी पावडर, कोडीन सिरपच्या १८३३ बाटल्या, अल्प्रझोलमच्या १७,७६५ गोळ्या आणि गांजा असा २५.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. तसेच पवारवाडी पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या दाखल गुन्ह्यातील आरोपींवर थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले गेले.

१९ गावठी कट्टे,२० काडतुसे जप्त

​’आर्म्स ॲक्ट’नुसार ५४ कारवाया करत ८० आरोपींकडून १९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुसे, ३० तलवारी, कोयते व इतर घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली. प्राणी संरक्षण, गुटखा अन् अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यासाठी देखील पोलिसांतर्फे वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. प्राणी संरक्षण कायद्यानुसार १३१ कारवायांमध्ये ३९० जिवंत गोवंश आणि ११,९०० किलो मांसासह वाहने मिळून एकूण १.९६ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिबंधित गुटख्याच्या ३४ कारवायांत ३७.५६ लाखांचा मुद्देमाल, तर जुगाराच्या १०० धाडींमध्ये २७४ आरोपींवर कारवाई करून रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले.

१४ सराईत तडीपार

​वर्षभरात पार पडलेले रमजान ईद, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद-ए-मिलाद आणि सप्तशृंगी गडासाठी जाणारा शिरपूर रथ यात्रा हे सण-उत्सव अत्यंत शांततेत पार पडले. तसेच मनपा निवडणूक २०२६ दरम्यान ९२ मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना यश आले. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातून वर्षभरात १४ सराईत गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.