​मालेगाव: शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. येथील नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. या निमित्ताने बोलताना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी एक विशेष ‘मालेगाव मॉडेल’ विकसित करण्यात येत असल्याची मोठी घोषणा गुंजाळ यांनी केली. या मॉडेलच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. या प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल हेही उपस्थित होते.

काय आहे हे मॉडेल?

या मॉडेलच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सुमारे एक हजार गुन्हेगारांची सविस्तर माहिती संकलित केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या गुन्हेगारांची घरे थेट गुगल मॅपशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे पोलिसांना संबंधित व्यक्तींपर्यंत जलद पोहोचणे आणि त्यांच्यावर प्रभावी पाळत ठेवणे शक्य होणार आहे. याशिवाय, संबंधित गुन्हेगार रात्री घरी उपस्थित आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांकडून नियमित पाहणी केली जाणार आहे. संबंधित व्यक्ती कोणता व्यवसाय करतात, ते अद्यापही गुन्हेगारीत सक्रिय आहेत का, त्यांचे राहणीमान आणि दैनंदिन हालचाली कशा आहेत, याचीही माहिती पोलिसांकडून तपासली जाणार आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्या नातेवाईकांशीही संपर्क ठेवला जाणार असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले.

‘तरुण पिढी नशेच्या आहारी..’

मालेगाव हे संवेदनशील शहर असल्याने येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे याला पोलीस दलाचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. सध्या मालेगावात अमली पदार्थांची अवैध विक्री व सेवन ही मोठी समस्या बनली आहे. तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे दिसत आहे. शहरातील बहुतेक गुन्हे हे अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांकडून घडत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. अमली पदार्थांची विक्री व सेवन थांबल्यास शहरातील गुन्हेगारी आपोआप कमी होणार आहे. त्यामुळे या धंद्यातील गुन्हेगारांचा बिमोड करण्यावर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय बेकायदा शस्त्रास्त्रे विक्री व बाळगणे,अवैध रस्ते वाहतूक यासारख्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले‌.

खास व्हॉट्सॲप नंबरचे प्रयोजन…

शहरातील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळावे म्हणून मालेगाव पोलीस दलातर्फे विशेष व्हॉट्सॲप नंबर (7588931112) उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही नागरिकाला अवैध धंद्यांसंदर्भात काही तक्रार वा सूचना करायची असल्यास ते या नंबरवर संदेश पाठवू शकतात. यामध्ये तक्रार वा सूचना करणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी केले आहे.