मालेगाव: शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असताना महापालिका प्रशासन ढिम्म असल्याची तक्रार करत मंगळवारी महाविकास आघाडीतर्फे मालेगावात खड्डे पूजन व वृक्षारोपण हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून मणक्याचे आजार आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मोसम पुलाजवळील खड्डयामुळे मध्यंतरी एकाचा बळी गेला होता. असे असताना महापालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आंदोलकांकडून करण्यात आली. याच संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख जितेंद्र देसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), या पक्षांसह ‘आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती’, सार्वजनिक नागरी सुविधा समिती, अखिल भारतीय मराठा महासंघ आदी सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
विकास गेला कुठे?
आंदोलकांनी रस्त्यांवरील खड्डयांभोवती आकर्षक रांगोळी काढत आणि गुलाल उधळत खड्डयांचे पूजन केले.तसेच खड्डयांमध्ये वृक्षांची लागवड देखील केली. ‘आपलं मालेगाव, खड्डयांचे मालेगाव’, ‘विकास कुठे गेला, खड्डयात गेला’ अशा घोषणा देऊन आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. शहरातील रस्त्यांवर झालेला १०० कोटींचा खर्च खड्डयांमध्ये गेला असून माती-मुरुम टाकून या रस्त्यांची आता केवळ मलमपट्टी केली जात असल्याची टीका यावेळी आंदोलकांनी केली.
…तर आंदोलन आणखी तीव्र करणार
शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्डयांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते लवकरात लवकर खड्डेमुक्त करावेत,दर्जाहीन रस्ते कामे उरकण्याची पद्धत थांबवून दर्जेदार कामे होतील,याची काळजी घ्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रश्नी महापालिका प्रशासनाकडून अशीच चालढकल सुरू राहिल्यास आयुक्तांच्या दालनात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात रामदास बोरसे, निखिल पवार,भरत पाटील, संदीप पवार, मयूर वांद्रे, विष्णू पवार, अर्जुन भाटी, हमीद लकडेवाले, जयेश अहिरे हमीद खान,सनी जगताप, कमलेश सोनवणे, भगवान चौधरी, रंगनाथ अहिरे, उध्दव पवार, अजय जगताप, सागर पवार, अतुल मोरे, सुभाष जगताप, किरण पवार, भीमा गवळी, मुकेश कबीरे, कपिल परदेशी, विलास येवले, संतोष ठाकरे, किरण पवार, निखिल अमृतकर, चंद्रशेखर डोंगरे, दीपक कदम, प्रवीण सोनार आदी सामील झाले होते.
