​मालेगाव: शहरातील वीज वितरणाची व्यवस्था सांभाळणाऱ्या ‘मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड’ (एमपीएसएल) या खाजगी कंपनीचा मनमानी आणि बेफिकीर कारभार सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. कोट्यवधी रुपयांची नियमित आणि वाढीव वीजबिले ग्राहकांकडून वसूल केली जात असताना, मूलभूत ग्राहक सुविधा देण्याच्या बाबतीत मात्र कंपनी हात वर करीत असल्याचे दिसत आहे. विशेषतः कंपनीची ग्राहक तक्रार निवारण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून ती केवळ कागदावरच शिल्लक राहिल्याने सर्वसामान्य वीजग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मालेगावमध्ये १ मार्च २०२० पासून ‘मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड’ (एमपीएसएल)) या खासगी कंपनीने वीज वितरणाचा ठेका सुरू झाला. मात्र, सुरुवातीपासूनच वाढीव बिले, सदोष वीज मीटर्स आणि सक्तीच्या वसुलीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने सातत्याने झाली; परंतु कंपनीच्या कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. उलटपक्षी, अघोषित वीजपुरवठा खंडित होणे आणि मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य मालेगावकरांना मोठ्या त्रासाला आणि आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.

​ एसएमएस अलर्ट कुठे आहे?

कंपनीने कारभार हाती घेतला तेव्हा तांत्रिक बिघाड, वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ आणि वीज कधी पूर्ववत होणार, याची पूर्वसूचना ग्राहकांना मोबाईल संदेशाद्वारे देण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ही उपयुक्त सुविधा अचानक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अचानक वीज गुल झाल्यानंतर नेमके काय झाले, वीज कधी येणार, याबाबत ग्राहक पूर्णपणे अंधारात राहतात.

​ टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सॲप केवळ देखावा

कंपनीकडून २४ तास ग्राहक सेवेचा दावा करत टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सॲप हेल्पलाईनचा मोठा गवगवा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात बिघाड झाल्यावर नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधतात तेव्हा एकतर फोन उचलले जात नाहीत. शिवाय कंपनीद्वारा सुविधा पुरवण्याचा दावा केल्यानुसार व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तेथे कुठलेच उत्तर मिळत नाही. तक्रार नोंदवून घेण्यासाठी कोणतीही तत्पर यंत्रणा कार्यरत नसल्याने तासनतास ग्राहकांना ताटकळत राहावे लागते.

​ उच्चपदस्थ अधिकारीही ‘नॉट रिचेबल’

टोल फ्री क्रमांक किंवा व्हाट्स ॲपवर तक्रार करता येत नसल्याने कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर एकतर प्रतिसाद मिळत नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने वैतागलेले अनेक सजग नागरिक थेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम सिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तेही फोन उचलण्याचे किंवा प्रत्युत्तर देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत, अशी थेट तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. त्यामुळे ​वाढीव बिले वेळेवर न भरल्यास तत्काळ कारवाई करणारी कंपनी स्वतःच्या सेवांबाबत मात्र इतकी निष्काळजी कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या बेजबाबदार कारभाराविरोधात ग्राहकांमध्ये तीव्र रोष असून प्रशासनाने याची तातडीने दखल न घेतल्यास मोठा जनआक्रोश उसळण्याची शक्यता आहे.

गेल्या मंगळवारी कॅम्प भागात दिवसभरात १५ ते २० वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. या संदर्भात ग्राहकांना पूर्वकल्पना तर दिली गेली नाहीच परंतू तक्रार करण्याची देखील सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे ग्राहकांना दिवसभर मोठा मनस्ताप सहन करावा लागला.- सुशांत कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्ते)*