मालेगाव: येथील म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.सोपान बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणातील सात संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आणि संशयितांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ‘लोकशाही धडक मोर्चा’च्या वतीने रविवारी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित म्युनिसिपल हायस्कूलमधील कथित गैरकारभाराच्या आरोपांवरून शासनाने प्रशासक नियुक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे चार सदस्यीय पथक शाळेत तपासणीसाठी गेले होते. या तपासणीदरम्यान प्रा. सोपान बोरसे (वय ४८) चक्कर येऊन खाली पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. शिक्षण विभागाकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या नाहक चौकशीच्या त्रासामुळे व दबावामुळेच बोरसे यांचा बळी गेल्याचा थेट आरोप शिक्षक संघटना व नातेवाईकांनी केला होता.
प्रा. बोरसे यांचे भाऊ प्रवीण बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मालेगाव शहर पोलीस ठाण्यात नाशिकचे शिक्षण उपसंचालक संजय राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, शाळेचे प्रशासक तानाजी घोंगडे, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे यांच्यासह तपासणी पथकातील अन्य अधिकारी अशा एकूण सात जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,गुन्हा दाखल होऊनही संशयित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अद्याप अटक न झाल्याने शिक्षक व नातेवाईकांमध्ये असंतोष पसरला आहे. याच अनुषंगाने रविवारी ‘लोकशाही धडक मोर्चा’च्या बॅनरखाली कार्यकर्ते,शहर व परिसरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी रस्त्यावर उतरले.
येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. साठ फुटी रोड,अहिंसा सर्कल व मोसम पूल मार्गे हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रशासनाला निवेदन सादर केले गेले. सर्व संशयितांना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा तसेच मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चात लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार, आर.डी.निकम,पवन ठाकरे,जितेंद्र देसले,अरुण पाटील, जीवन हिरे, गोरख खैरनार,गजू देवरे, मनोज जगताप, सुधीर चव्हाण, अमोल निकम, किशोर निकम, संजय बांधणे, पोपट पवार, दत्तात्रय खैरणार, विनोद बोरसे, अंबादास बोरसे, संजय गायकवाडं,अशोक कन्नोर,आनंदा अहिरे, भगवान पानपाटील आदी सामील झाले होते.
