मालेगाव: भारताचा ‘पोलिओमुक्त देश’ हा बहुमान कायम राखण्यासाठी मालेगाव महानगरपालिका प्रशासन संपूर्ण ताकदीनिशी सज्ज झाले आहे. येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी संपूर्ण शहर परिसरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत मालेगाव मनपा क्षेत्रातील नुकत्याच जन्मलेल्या शिशूपासून ते ५ वर्षे वयोगटातील तब्बल १,०९,४०४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेसाठी महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून सर्व स्तरांवर अत्यंत काटेकोर आणि चोख नियोजन केले जात आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण मालेगाव शहरात विविध ठिकाणी ५१८ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत. तसेच, शहराच्या प्रत्येक भागात पोहोचण्यासाठी ३८५ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेत मनपाचे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
प्रत्येक बालकावर लक्ष
शहरातील दुर्गम भाग, झोपडपट्टया आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोहोचण्याची रणनीती प्रशासनाने आखली आहे. रविवारच्या मुख्य मोहिमेदरम्यान जी बालके काही कारणास्तव पोलिओ बूथवर येऊ शकणार नाहीत किंवा डोस घेण्यापासून वंचित राहतील, त्यांच्यासाठी मनपा आरोग्य विभागामार्फत पुढील काही दिवस विशेष घरभेट मोहीम राबवली जाणार आहे. ही पथके थेट नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन सुटलेल्या बालकांचा शोध घेतील आणि जागेवरच त्यांचे लसीकरण पूर्ण करतील. शहरात एकही बालक या जीवनरक्षक डोसपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण खबरदारी मनपा प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.
पोलिओचा धोका टळावा म्हणून..
पोलिओ हा बालकांना कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा अत्यंत गंभीर आजार आहे. एकदा या आजाराची लागण झाल्यास त्यावर कोणताही इलाज नाही, त्यामुळे वेळेवर प्रतिबंधक लस देणे हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे. म्हणूनच, नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून ते ५ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक लहान मुलाला पोलिओचे दोन थेंब देणे पालकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही बालक पोलिओच्या धोक्यापासून असुरक्षित राहू नये, यासाठी मालेगाव शहरातील सर्व पालकांनी रविवार, २८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जावे आणि डोस पाजून आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन महापौर नसरीन बानो शेख,आयुक्त रवींद्र जाधव व आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी केले आहे.
