नाशिक – यंत्रमाग उद्योगात अग्रेसर असलेल्या मालेगाव शहराचा देशातील पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११० शहरांमध्ये समावेश आहे. मालेगाव वगळता अन्य सर्व शहरे रेल्वे मार्गाशी जोडली गेली असून, मालेगावला रेल्वे मार्गाशी जोडण्यासाठी मनमाड-मालेगाव-धुळे या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही मोहीम स्तरावर सुरू करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, असे निर्देश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
मनमाड-मालेगाव-धुळे हा मनमाड-धुळे-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा भाग आहे. मध्य प्रदेशमध्ये भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू असताना नाशिक जिल्ह्यातही ती त्याच प्रकारे व्हावी, अशी रेल्वे प्रशासनाची अपेक्षा आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील २२ गावांमध्ये जळपास ३६३ हेक्टर जमीन संपादित करायची आहे. हा रेल्वेमार्ग नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक आणि धुळे जिल्हा प्रशासनाशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत प्रस्तावित रेल्वेमार्गाचा आढावा घेतला. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (नाशिक), भाग्यश्री विसपुते (धुळे), सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
मालेगाव हे उत्तर महाराष्ट्रातील यंत्रमाग, वस्त्रोद्योग, उद्योग आणि व्यापाराचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या शहराशी थेट रेल्वे जोडणीमुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मनमाड-मालेगाव-धुळे रेल्वेमार्गामुळे प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीला मोठी चालना मिळू शकते. कच्चा माल, यंत्रसामग्री आणि तयार उत्पादनांच्या वाहतुकीसाठी अधिक सक्षम पर्याय उपलब्ध होऊन उद्योगांच्या विस्ताराला मदत होणार आहे.
मनमाड-मालेगाव-धुळे रेल्वेमार्ग आणि औद्योगिक क्लस्टर विकास या दोन्ही बाबींमुळे मालेगावच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळू शकते. रेल्वे जोडणीमुळे औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीचा खर्च व वेळ कमी होण्यास मदत होईल. तसेच व्यापारी, उद्योजक, कामगार आणि प्रवाशांसाठी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. मालेगावचे भौगोलिक, लोकसंख्यात्मक आणि औद्योगिक महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे जोडणीचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा प्रशासन, रेल्वे यंत्रणा आणि उद्योग विभाग यांच्या समन्वयातून या प्रस्तावाच्या पुढील कार्यवाहीला गती मिळाल्यामुळे मालेगावच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होण्यास मदत होणार आहे.
औद्योगिक क्लस्टरचा विकास
मालेगाव शहराचा विकास केवळ रेल्वे जोडणीपुरता मर्यादित न ठेवता औद्योगिक क्लस्टरच्या माध्यमातून शहराला सक्षम औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. यासाठी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी पुढाकार घेऊन औद्योगिक क्लस्टरच्या विकासाला चालना द्यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
भूसंपादनासाठी शेतकऱ्यांशी संवाद
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रस्तावित मनमाड-मालेगाव-धुळे रेल्वेमार्गासाठी आतापर्यंत झालेल्या भूसंपादनाची माहिती दिली. उर्वरित क्षेत्राच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत असून, लवकरच हा विषय मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
२२ गावांमध्ये भूसंपादन…
मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सहा गावे आणि मालेगाव तालुक्यातील १६ गावांमधील ३६३.२६ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. काही ठिकाणी संयुक्त मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला होता. मालेगावमध्येही भूसंपादनाचे दर अमान्य करीत शेतकऱ्यांनी विरोध कायम ठेवला होता.
