मालेगाव: जागतिक राजकारणातील अस्थिरता आणि इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, परिणामी येत्या काही दिवसात मालेगाव शहरात फ्लॅट, शॉप्स आणि रो-हाऊसच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ होणे अनिवार्य असल्याचे संकेत ‘क्रेडाई मालेगाव’ने दिले आहेत.

​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या विविध साहित्याच्या दरात २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. प्रामुख्याने लोखंडाच्या दरात २०%, टाईल्स ३५%, पीव्हीसी पाईप ४०%, सॅनिटरी व बाथ फिटिंग २५%, ॲल्युमिनियम खिडक्या २८%, तर इलेक्ट्रिक फिटिंग आणि कलरच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चामुळे बांधकाम व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

​केवळ साहित्याचे दरच नव्हे, तर सध्या मजुरांची देखील मोठी टंचाई भासत आहे. शिवाय बांधकाम मजुरांच्या मजुरीत वाढ झाल्याने बांधकाम खर्चात भर पडली आहे. ही परिस्थिती पाहता, वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्याशिवाय विकासकांकडे दुसरा पर्याय उरलेला नसल्याचे दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

​युद्धाच्या या सावटाचा परिणाम केवळ बांधकाम क्षेत्रावरच नाही, तर कृषी उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर लहान-मोठ्या उद्योगांवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. इराण व अमेरिका या दोन देशांदरम्यान शांती चर्चा सुरू असली तरी अद्याप ठोस मार्ग निघत नसल्याने बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण आहे.​ बाजारपेठेतील ही अनिश्चितता कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘दरवाढीशिवाय पर्याय नाही’

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या मालाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. लोखंड, सिमेंट आणि इतर साहित्याचे दर वाढल्यामुळे बांधकाम खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. विकासकांनी आतापर्यंत जुन्या दरात ग्राहकांना घरे उपलब्ध करून दिली, मात्र जूनपासून २० ते २५ टक्के दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

  • (विजय सोनवणे,अध्यक्ष, क्रेडाई मालेगाव)