मालेगाव: ‘रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजन’ या संस्थेने सेवाकार्याचा आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. क्लबने वर्षभरात समाजोपयोगी ९९ प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, शुक्रवारी या क्लबतर्फे १०० वा प्रकल्प राबविण्यात आला. या शतकी प्रकल्पांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात शंभर पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरात स्वतः क्लबचे माजी अध्यक्ष दीपक शेलार यांनी रक्तदानाची शंभरी गाठली आहे.

अडीच वर्षापूर्वी स्थापन झालेल्या रोटरी व्हिजन या क्लबने समाजातील विविध गरजा ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करण्यावर प्रामुख्याने भर दिला आहे. क्लबच्या वतीने आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मोफत डायलिसिस सुविधा

या क्लबतर्फे शहरातील दोन ठिकाणी मोफत डायलिसिस सुविधा सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही केंद्रांवर आतापर्यंत रुग्णांना एकूण १७०० वेळा मोफत डायलिसिस सुविधा देण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने ‘मसगा’ महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या शिवणकाम व फॅशन डिझाईन प्रशिक्षण केंद्राद्वारे ३२ मुलींना प्रशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय,लेंडाने येथील प्राथमिक शाळेतील ‘वॉटर फिल्टर’,दाभाडी येथे शवपेटी प्रकल्प या सारखे कायमस्वरूपी प्रकल्प क्लबतर्फे चालविले जात आहेत.

शेवटच्या घटकांकडे लक्ष

आरोग्य क्षेत्रात नेत्रतपासणी, दंत चिकित्सा, मधुमेह रुग्णांना ग्लुकोमीटर वाटप याद्वारे हजारो नागरिकांना थेट लाभ देण्यात आला आहे. ​मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी व दुर्गम भागातील बांधवांसाठीही क्लबने मोठे कार्य केले आहे. साल्हेर, मुल्हेर परिसरात शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे आणि मजुरी करून कुटुंब सांभाळणाऱ्या ५० आदिवासी महिलांचा दिवाळीत साडी आणि फराळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच राजधानी गारमेंट, महाराष्ट्र कलेक्शन व दत्तप्रसाद क्लासेसच्या वतीने तब्बल दीड लाख रुपये मूल्याच्या कपड्यांचे वाटप आदिवासी महिला व मुलींना करण्यात आले. येत्या काळात शहरात ‘रोटरी उद्यान’, ‘कलाकार कट्टा’ आणि ‘गोशाळा’ हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा क्लबचा मनोदय असल्याचे क्लबचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सांगितले.

दीपक शेलार यांना शतकवीर पुरस्कार

मालेगाव रोटरी व्हिजन क्लबतर्फे शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबीर हा वर्षभरातील शंभरावा प्रकल्प होता. या निमित्ताने क्लबतर्फे शंभर पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. या शिबिरात क्लबचे माजी अध्यक्ष दीपक शेलार यांनी आपल्या आयुष्यातील शंभराव्या वेळी रक्तदान केले. ५५ वर्षीय शेलार यांनी वयाच्या १८ व्या वर्षी पहिल्यांदा रक्तदान केले होते. त्यानंतर दरवर्षी जवळपास तीन वेळा त्यांनी रक्तदान केले आहे. या निमित्ताने क्लबतर्फे शेलार यांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात ‘रक्तदाता शतकवीर’ म्हणून गौरविण्यात आले. या प्रसंगी भुसे यांनी क्लबच्या उपक्रमांचे आणि रक्तदानाची शंभरी गाठणाऱ्या शेलार यांची प्रशंसा केली. या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे, असिस्टंट गव्हर्नर अरुण पवार, क्लबचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर सोनवणे, डॉ.दिलीप भावसार, प्रकल्प प्रमुख संजय फतनाणी, सचिव वैभव सोनवणे, विजय डोखे,रमेश मोरे,शेखर सोनवणे, प्रसाद पेटकर, प्रशांत सोनवणे, सागर रौंदळ, डॉ.शरद शिरोळे, डॉ.ऋषिकेश पाटील,विनोद शेलार, प्रवीण पाटील, राजाराम पवार,संजय कांडेकर आदी उपस्थित होते.