मालेगाव : परराज्यातून आणलेली खासगी वाहने महाराष्ट्रात विनानोंदणी वर्षानुवर्षे वापरणाऱ्या वाहनमालकांवर आता प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी ५ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ४७ नुसार, एका राज्यात नोंदणीकृत वाहन दुसऱ्या राज्यात सलग एक वर्षापेक्षा अधिक काळ वापरले जात असल्यास, संबंधित राज्यात त्या वाहनाची पुनर्नोंदणी करणे आणि विहित मोटार वाहन कर भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे परराज्यातील क्रमांक असलेले वाहन महाराष्ट्रात दीर्घकाळ वापरताना संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय, महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५४ नुसार, परराज्यातून महाराष्ट्रात आणलेल्या वाहनाची माहिती स्थानिक नोंदणी प्राधिकरणाला सात दिवसांच्या आत विहित नमुन्यात (फॉर्म एफ.टी.) सादर करणे आवश्यक आहे. मात्र, परराज्यातून वाहने खरेदी करून तेथील नोंदणी क्रमांकावरच महाराष्ट्रात अनेक वर्षे वाहने वापरण्याचे प्रकार आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास येत आहे.
परराज्यातील वाहनांचा अशा प्रकारे दीर्घकाळ वापर केल्यामुळे शासनाच्या मोटार वाहन कराच्या महसुलाचे नुकसान होत असल्याने परिवहन विभागाने आता अशा वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार कार्यक्षेत्रातील परराज्यात नोंदणीकृत खासगी वाहनांची ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी केली जात असल्याची माहिती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके यांनी दिली. तपासणीदरम्यान वाहनाची नोंदणी, महाराष्ट्रात वापराचा कालावधी, कर भरणा तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनमालकांवर कारवाई केली जाणार आहे.
संबंधित वाहनमालकांनी परराज्यातील वाहनांची नियमानुसार पुनर्नोंदणी करून थकीत मोटार वाहन कर तातडीने भरावा, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. विशेष तपासणी मोहिमेत नियमभंग आढळल्यास दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही परिवहन विभागाने दिला आहे.
