मालेगाव: मालेगाव-सटाणा या राज्यमार्ग क्रमांक १९ वरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी रस्ता चौपदरीकरणाच्या मागणीने गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. ही मागणी पूर्णत्वास जाण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. सुमारे ३९ किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे काँक्रीटीकरणासह चौपदरीकरण तातडीने मंजूर करण्यात यावे, असा आग्रह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला आहे. या कामासाठी आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी उपलब्ध करून घेण्याबाबतही भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
मालेगाव-सटाणा हा रस्ता केवळ स्थानिक दळणवळणासाठीच नव्हे, तर आंतरराज्य वाहतुकीसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उत्तर महाराष्ट्रातील व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा मार्ग मालेगावमार्गे पुणे, इंदूर, छत्रपती संभाजीनगर आणि सटाणामार्गे सुरत (गुजरात) सारख्या मोठ्या शहरांना जोडणारा एक प्रमुख दुवा आहे. कृषी माल, विशेषतः कांदा आणि डाळिंबाच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी या रस्त्याचा सर्वाधिक वापर होतो. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे; मात्र रस्त्याच्या अरुंद स्वरूपामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे.
सर्वात भीषण बाब म्हणजे, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक नागरिक कायमचे जायबंदी झाले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांमध्ये मोठा असंतोष असून, रस्ता रुंदीकरणाची मागणी जोर धरत आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे वारंवार घडणाऱ्या अपघातांचा धोका टळण्यास मदत होईल. तसेच वाहतूक कोंडी सुटल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधनाचीही बचत होईल. हा मार्ग थेट गुजरात राज्याशी जोडला जात असल्याने व्यापारी उलाढाल वाढण्यास मदत होईल. रस्ता विकास झाल्यास परिसरातील उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, याकडे भुसे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे काँक्रीटीकरण व चौपदरीकरण होणे ही काळाची गरज असल्याचे भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना पटवून दिले. विविध पक्षीय स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. आता खुद्द दादा भुसे यांनी या प्रश्नात पुन्हा लक्ष घातल्याने आणि निधीसाठी आशियाई विकास बँकेचा पर्याय सुचवल्याने, या मार्गाचे काम लवकरच मार्गी लागेल, अशी आशा पल्लवित झाली आहे.
