मालेगाव : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटल्यावरही पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणांनी तळ गाठला असून त्यामुळे मालेगाव शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. उपलब्ध अत्यल्प पाणीसाठा अधिकाधिक दिवस पुरविण्याचे आव्हान उभे ठाकल्याने येत्या शनिवारपासून शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मालेगाव महानगरपालिकेने घेतला आहे. चणकापूर आणि गिरणा धरणातून मालेगावला पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होऊ शकला नव्हता. यंदादेखील आतापर्यंत पावसाने निराशाच केली असून लोकांची चिंता वाढली आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर धरणात ११७ दशलक्ष घनफूट म्हणजे अवघा ४.८२ टक्के तर गिरणा धरणात २१७३ दशलक्ष घनफूट म्हणजे ११.७५ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. चणकापूर धरणातून मिळणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेने तळवाडे येथे निर्माण केलेल्या साठवण तलावात जेमतेम ३५ दशलक्ष घनफूट जलसाठा शिल्लक आहे. हेही वाचा.नाशिक : भावली धरणालगतच्या रस्त्यावर दरड कोसळली पावसाने ओढ दिल्याने उपलब्ध असणारा हा पाणीसाठा ऑगस्ट महिना अखेरपर्यंत पुरविण्याचे आव्हान उभे ठाकल्याने २७ जुलैपासून शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतला आहे. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याचा भाग म्हणून सप्टेंबर महिन्यापासून महापालिकेतर्फे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र,आता तो तीन दिवसाआड केला जाणार असल्याने ऐन पावसाळ्यात शहरवासियांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेही वाचा.नाशिक : महावितरणच्या भोंगळ कारभारावर उद्योजक संतप्त, कार्यकारी अभियंत्याकडून दिलगिरी पाणी कपातीबरोबरच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी देखील महापालिका प्रशासनाने उपायोजना सुरू केल्या आहेत. शहरातील ज्या नळधारकांनी नळांना तोट्या लावलेल्या नाहीत, त्यांनी तत्काळ तोट्या लावून घेण्याची सज्जड ताकीद देण्यात आली आहे. जे नागरिक नळ आल्यावर घरासमोर,रस्त्यावर किंवा गटारीत पाणी सोडून देतात, तसेच या पाण्याने वाहने धुण्याची कृती करतात, त्यांच्याकडेही महापालिका यापुढे नजर ठेवणार आहे. कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचा इशारा आयुक्त जाधव यांनी दिला आहे.