मालेगाव : ऊस दिल्यानंतर ८ महिने उलटूनही हक्काचे पैसे न मिळाल्याने रावळगाव येथील ‘एस.जी.एनर्जी’ या खाजगी साखर कारखान्याविरोधात बळीराजाचा आक्रोश अधिकच तीव्र झाला आहे. ‘बँकेचे कर्ज मंजूर झाले की मग उसाचे चुकारे अदा करू’ अशी अजब भूमिका घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत ढकलणाऱ्या कारखाना प्रशासनाने आता थेट संवादाचे दरवाजेच बंद केले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या पीडित शेतकऱ्यांनी सोमवारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, १५ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मालेगाव तालुक्यातील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या जानेवारी महिन्यात या कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. ऊस देऊन ८ महिने झाले तरी शेतकऱ्यांना छदामही मिळालेला नाही. यापूर्वी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेऊन कारखान्याला अल्टीमेटम दिल्यानंतर चाळीसगाव परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे तातडीने अदा करण्यात आले होते. मात्र, मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत कारखाना प्रशासन सतत टाळाटाळ करत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
कारखान्याला टाळे, अधिकारी गायब!
रावळगाव येथील ‘एस. जे. शुगर’ कारखान्याच्या साईटवर गेल्यावर तेथे कुलूप लावण्यात आल्याचे धक्कादायक चित्र निदर्शनास येत आहे. कारखान्याच्या आवारात केवळ रखवालदाराव्यतिरिक्त कोणीही अधिकारी किंवा जबाबदार व्यक्ती भेटत नाही. हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना वारंवार खेटे मारावे लागत आहेत. कारखान्याचे कृषी अधिकारी आणि संचालकांशी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळत नाहीत. कारखाना व्यवस्थापनाच्या या बेजबाबदार आणि पलायनवादी भूमिकेमुळे शेतकरी रडकुंडीला आले आहेत.
मध्यस्थी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन!
वेळेवर पैसे न मिळाल्याने पीककर्जाचा हप्ता भरणे, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन घरखर्च भागवणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. वारंवार उंबरठे झिजवूनही कारखाना प्रशासन दाद देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी प्रशासकीय मध्यस्थीची मागणी केली आहे. भारतीय किसान युनियनचे प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली चरणसिंग गिल, संजय गिल,चरणसिंग छरंग, पद्मशिंग छरंग, दत्तू रसोडा, सुशांत छरंग आदी शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन सादर केले. या प्रश्नी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून उसाची थकीत रक्कम व्याजासह अदा करण्यास कारखान्याला भाग पाडावे, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.
