मालेगाव: तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मालेगाव शेतकी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या गटाने दमदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत भुसे गटाने सर्वच्या सर्व १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत शेतकी संघावर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. विशेष म्हणजे, आजवर या संस्थेवर वर्चस्व राखणाऱ्या भाजपच्या अद्वय हिरे गटावर प्रथमच दारुण पराभवाची नामुष्की ओढवली आहे.
शेतकी संघाच्या एकूण १५ जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यासाठी रविवारी मतदान पार पडले. सोमवारी या निवडणुकीची मतमोजणी झाली. मंत्री दादा भुसे यांच्या गटाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सर्व १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. याउलट, कधीकाळी या संस्थेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या अद्वय हिरे गटाची या निवडणुकीत मोठी अडचण झाल्याचे बघावयास मिळाले. त्यांना १५ पैकी केवळ ९ जागांवरच आपले उमेदवार उभे करता आले. हिरे गटाला संपूर्ण पॅनेलही उभे करता न आल्यामुळे निवडणुकीचा कल सुरुवातीपासूनच भुसे गटाच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले होते आणि निकालातून त्यावर शिक्कामोर्तब देखील झाले.
दादा भुसे गटाचा झेंडा
सहकारी संस्था गटातून आत्माराम आधार अहिरे, सुभाष सोनु गिल, सचिन एकनाथ साळुंके, ईश्वर महादू सिसोदे,दिनकर महादू चव्हाण व आकाश मधूकर हिरे हे भुसे गटाचे सहा जण विजयी झाले. या गटातून अद्वय हिरे गटाचे अशोक आखाडे, वेदिका पवार व शिला सूर्यवंशी यांना पराभव पत्करावा लागला. वैयक्तिक गटातून भुसे गटाचे मधूकर देवमन देवरे,विजय लहु निकम, रविंद्र बळीराम शेवाळे व मयुर केवळ हिरे हे विजयी झाले आहेत. हिरे गटाचे रवींद्र नरवडे व जीवन अहिरे यांना पराभूत व्हावे लागले आहे. महिला राखीव गटातून मंगला धर्मा भामरे व पुष्पा मुरलीधर शिंदे या विजयी झाल्या आहेत. वेदिका पवार यांना पराभव पत्करावा लागला आहे. ओबीसी गटातून अनिल देवराम निकम हे विजयी झाले आहेत. त्यांनी जीवन हिरे यांचा पराभव केला आहे. अनुसूचित जाती-जमाती गटातून बाळू खंडू ठाकरे हे विजयी झाले असून त्यांनी जीवन गरुड व संतोष कासवे यांचा पराभव केला आहे. विमुक्त जाती भटक्या विमुक्त जमाती गटातून प्रदीपकुमार नवलसिंग पवार हे विजयी झाले असून त्यांनी सचिन पवार यांचा पराभव केला आहे.
हिरे गटाचा प्रथमच पराभव
मालेगाव शेतकी संघाच्या इतिहासात या संस्थेवर सुरुवातीपासूनच हिरे गटाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हिरे गटाला या संस्थेवर प्रथमच जबर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भुसे गटाने रणनीती आखत हिरे गटाची सत्ता मोडून काढण्यात यश मिळवले आहे. सहकार खात्याचे उपनिबंधक जितेंद्र शेळके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितले. सहाय्यक निवडणूक अधिकारी योगिता खैरनार, शेतकी संघाचे प्रशासक स्वप्नील मोरे, सहकार अधिकारी संदीप अहिरे, प्रतीक वाकचौरे व दीपक अहिरे यांनी त्यांना सहकार्य केले.
