मालेगाव: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, यात मालेगावचा डंका चांगलाच वाजला आहे. शहराच्या सोयगाव भागातील कार्तिक बच्छाव याने देशात १७७ वा क्रमांक पटकावून आयएएस पदाला गवसणी घातली आहे, तर तालुक्यातील पाटणे येथील धनश्री अहिरे हिने ४८९ व्या रँकसह घवघवीत यश संपादन केले आहे.तिला आयपीएस पद मिळण्याची शक्यता आहे.

कार्तिक बच्छाव याने सलग दुसऱ्या वर्षी यूपीएससी परीक्षेत आपले नाव कोरले आहे. गेल्या वर्षीही त्याने ४६९ व्या रँकसह यश मिळवले होते. त्यावेळी त्याची ‘आयपीएस’ पदासाठी निवड झाली होती. मात्र, ‘आयएएस’ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने पुन्हा अभ्यास सुरूच ठेवला. आणि यावर्षी आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्याने अखेर हे स्वप्न पूर्ण केले.

यंदा एकूण १८० आयएएस व १५० आयपीएस पदे उपलब्ध आहेत. त्यामुळे कार्तिकने मिळवलेला १७७ वा क्रमांक पाहता, त्याला यावेळी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) हा संवर्ग मिळण्याची दाट शक्यता आहे. कार्तिकने आयआयटी पवई येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. कोणतीही मोठी खासगी शिकवणी न लावता पुण्यात राहून केवळ स्वयंअध्ययनाच्या जोरावर त्याने हे यश खेचून आणले आहे. मुख्य परीक्षेसाठी त्याने ‘मानववंशशास्त्र’हा विषय निवडला होता.

​शेतकरी कन्येची मोठी झेप

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेत ​मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील धनश्री अहिरे हिने मिळवलेले यश हे देखील असेच अफलातून आहे. तिची जिद्द व कष्ट खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनश्रीने गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या वनसेवा परीक्षेत यश मिळवत सहाय्यक वन संरक्षक (एसीएफ) हे पद मिळवले होते. मात्र, तिचे ध्येय दिल्ली गाठण्याचे होते. खडतर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर तिने अखेर ४८९ व्या क्रमांकासह यूपीएससीच्या यशाला गवसणी घातली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मॅथेमॅटिक्समध्ये बीएस्सी पदवी घेतल्यानंतर धनश्री लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळाली. लहानपणापासूनच तिला प्रशासकीय सेवेची आवड होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत पाचव्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तीन वेळा ती या परीक्षेच्या मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचली होती. मात्र प्रत्येक वेळी यशाने तिला हुलकावणी दिली होती. मात्र,तिने हार मानली नाही. यावेळी तिने चौथ्यांदा मुलाखत दिली व यश खेचून आणले. ४८९ रंग मिळाल्याने धनश्री हिला आयपीएस संवर्ग मिळण्याची शक्यता आहे. धनश्री हिच्या यशाबद्दल पाटणे येथील शेतकरी कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​मालेगावसाठी अभिमानास्पद क्षण

कार्तिक बच्छाव व धनश्री अहिरे या दोघांच्या यशामुळे ​मालेगावचे नाव पुन्हा एकदा प्रशासकीय परीक्षांच्या वर्तुळात चर्चेत आले आहे. कार्तिकचे वडील रवींद्र बच्छाव हे अभियंता व आई कल्पना गृहिणी आहेत. मूळचे सोयगाव येथील हे कुटुंब सध्या व्यवसायानिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे. कार्तिक याने मिळविलेल्या यशाची बातमी समजताच सोयगाव व मालेगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.