मालेगाव: एकीकडे नाशिकमध्ये ‘कृषी कुंभ’प्रदर्शनाचा मोठा थाट सुरू असताना, दुसरीकडे मात्र त्याचा मालेगावच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. या प्रदर्शनासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या मालेगाव आगारातून मोठ्या प्रमाणात बस गाड्या तिकडे वळवण्यात आल्याने,अनेक बस फेऱ्यांवर गंडांतर आले आहे. अनेक मार्गांवरील बस फेऱ्या ऐन परीक्षेच्या काळात रद्द झाल्याने विद्यार्थी तसेच अन्य प्रवाशांना हेळसांड सहन करावी लागत असल्याची ओरड होत आहे.
शेतीतील उत्पन्न आणि उत्पादकता वाढविणे तसेच शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यावर भर द्यावा, या हेतूने नाशिक येथे गुरुवारपासून चार दिवस कृषी कुंभ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विकास आराखडा ‘नाशिक फेस्टिवल’ अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, आत्मा व माविमच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
गावोगावच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कुंभमध्ये सहभागी व्हावे,यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी मोफत बस गाड्यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी मालेगाव आगाराच्या बस गाड्यांची मोठ्या प्रमाणावर बुकिंग करण्यात आली आहे. मालेगावातून १२ मार्चसाठी ३८,१३ मार्चसाठी ३२, १४ मार्चसाठी ३० व १५ मार्चसाठी २५ बस गाड्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुक करण्यात आल्या आहेत.
मालेगाव आगारात एकूण ७१ बस गाड्या आहेत. त्यापैकी नाशिक कृषी कुंभसाठी मोठ्या प्रमाणावर बस गाड्या उपलब्ध करून दिल्याने मालेगाव आगारातील अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात मालेगाव-नाशिक या मार्गावरील १६,मालेगाव-पाचोरा या मार्गावरील ८, पंढरपूर, सोलापूर,अक्कलकोट,पुणे, सुरत व अहमदाबाद या मार्गावरील प्रत्येकी एका फेरीचा समावेश आहे. याशिवाय स्थानिक ५२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मालेगाव ग्रामीण भागात मुक्कामी थांबणाऱ्या १२ बस फेऱ्या चार दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे बस गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असून बसच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. विशेषत: ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याची ओरड होत आहे. अन्य प्रवाशांनाही त्याचा फटका बसत असल्याची ओरड होतं आहे.
प्रदर्शनात काय?
या प्रदर्शनात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध दालने उभारण्यात आली आहेत. ड्रोन तंत्रज्ञान, ‘फसल’ व ‘फायलो’ कंपनीचे स्मार्ट सेन्सर, इलेक्ट्रिक बुल तसेच कांदा चाळीसाठी सेन्सर आधारित यंत्रणेची माहिती देणारे स्टॉल. यांत्रिकीकरण विभागात ३० पेक्षा अधिक स्टॉल, तर शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या प्रदर्शनात १३ मार्च रोजी द्राक्ष शेतीचा नवा मंत्र व निर्यात क्षमता (पंकज नाठे, अनंत मोरे), १४ मार्च रोजी डाळिंब शेती व मधमाशी पालन (तुकाराम निकम, सोमनाथ गांगुर्डे), १५ मार्च रोजी कांदा पिकाचे आधुनिक व्यवस्थापन (डॉ. राजीव काळे, डॉ. तुषार आमरे) याविषयावर, तर १६ मार्च रोजी कृषी क्षेत्रातील एआयचा वापर (गटचर्चा) याविषयावर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय कृषी कुंभमध्ये रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १४ मार्च रोजी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि १५ मार्च रोजी ‘फोकलोक’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
