मालेगाव: दगड माफियांची मुजोरी किती धोकेदायक स्थितीला पोहोचली आहे, याची थरारक प्रचिती देणारा एक प्रसंग मालेगावातून समोर आला आहे. शहराला लागून असलेल्या सायने बुद्रुक शिवारात शासकीय जमिनीवर होणारे अवैध गौण खनिज उत्खनन आणि चोरी रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या अंगावर माफियांनी आधी ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. नंतर चालत्या ट्रॅक्टरने काही अंतरापर्यंत या तलाठ्याला फरफटत नेण्यात आले. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा संशयीतांना तात्काळ अटक केली आहे.
सायने बुद्रुक येथील तलाठी गोविंद तिडके यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायने बुद्रुक येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरासाठी तलाठी तिडके हे त्यांचे सहकारी तलाठी मनोज खरोटे आणि किशोर थोरात यांच्यासह गेले होते. या भागातून हे तिघे दुचाकीने जात असताना त्यांना दगडाने भरलेला एक संशयास्पद ट्रॅक्टर जाताना दिसला. त्यावरून तेथील शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ब्लास्टिंग आणि गौण खनिज चोरी होत असल्याचा संशय आला. त्यानुसार हे तिन्ही तलाठी तिथून काही अंतरावर असलेल्या शासकीय जागेवर पोहोचले.
अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न!
या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ब्लास्टिंग सुरू असल्याचे दृश्य या तलाठ्यांना दिसले. महसूल अधिकारी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने चालकाला ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्यास सांगितले. त्यानुसार चालकाने ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. तेव्हा तलाठी गोविंद तिडके यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने थेट त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत तिडके यांनी स्वतःचा बचाव करत ट्रॅक्टरच्या बाजूच्या अँगलला पकडले, मात्र मुजोर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता त्यांना तशाच अवस्थेत काही अंतर फरफटत नेले.
शासकीय कामात अडथळा आणि दुखापत
या घटनेत तलाठी तिडके यांच्या हाताला आणि दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. मुजोर दगड माफियांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान, गौण खनिजाची चोरी तसेच सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्याच्या जीवावर बेतणारे कृत्य केले आहे. याप्रकरणी जखमी तलाठी गोविंद तिडके यांच्या तक्रारीवरून चालक पवनकुमार हुसेनआप्पा व ट्रॅक्टर मालक पुरभाजी रामदास गायकवाड (दोन्ही रा. सायने बु.) यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक तुषार भदाणे हे पुढील तपास करीत आहेत.
