मालेगाव : मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षकाची कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुण शिक्षकाची तब्बल ३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थाचालक व त्यांच्या मुलाविरोधात येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोयगाव येथील रहिवासी अमोल साळुंके (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०१५ मध्ये त्यांच्या चुलत मामांच्या मध्यस्थीने संबंधित संस्थाचालकांची भेट घेण्यात आली होती. यावेळी संस्थाचालक व त्यांच्या मुलाने शिक्षकाची नोकरी देण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम दिल्यानंतर शाळेत इंग्रजी विषय शिकवण्यासाठी रुजू करून घेण्यात आले, मात्र कोणताही अधिकृत नियुक्ती आदेश दिला नाही,असे साळुंके यांनी तक्रारीत म्हटले आहे.
संशयीतांनी २०१५ ते २०२४ या तब्बल ९ वर्षांच्या कालावधीत विनामोबदला राबवून घेतले. या काळात शाळेत शिक्षक म्हणून काम करून घेण्यासोबतच स्वतःच्या खाजगी गाडीवर ड्रायव्हर, घरातील कामे करण्यासाठी घरगडी आणि शाळेच्या कार्यक्रमांचे फोटो काढण्याचे कामही आपल्याकडून करून घेण्यात आल्याचे साळुंखे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
३ लाख रुपये घेऊनही नोकरीचे नियुक्तीपत्र दिले नसताना २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांकडे नोकरीसाठीचा प्रस्ताव पाठविण्याच्या नावाखाली आणखी ३० हजार रुपये घेण्यात आले. पुढे २०२१ मध्ये शाळेतील काही शिक्षक निवृत्त झाल्यावर कायमस्वरूपी नोकरीसाठी विचारणा केली असता संशयीतांकडून आणखी ७ लाख रुपयांची मागणी केली गेली. पैसे देण्यास असमर्थता दर्शवली असता, आपणास अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
तसेच नियुक्तीपत्र न मिळाल्याने आणि आजारी वडिलांच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याने नोकरीसाठी दिलेले पैसे परत मागितल्यावर संस्थाचालक व त्यांच्या मुलाने शिवीगाळ व दमदाटी केल्याचे साळुंके यांनी म्हटले आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी संस्थाचालक व त्यांच्या मुलाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील ३१८(४), ३३६(३), १४६, ३५१(२), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.
