​मालेगाव: राज्यभरात शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, शासकीय अनुदानाची पळवापळवी आणि आर्थिक गैरव्यवहाराची नवनवीन प्रकरणे रोज चव्हाट्यावर येत असतानाच, आता मालेगाव तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील टेहरे येथील एका नामांकित शाळेत तब्बल साडे अठ्ठावीस लाख रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी माजी मुख्याध्यापकासह कुटुंबातील दोघांवर येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय अनुदानाच्या पैशांवरच डल्ला मारल्याचा गुन्हा दाखल झाल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​तालुक्यातील टेहरे येथील सर्वांगीण विकास मंडळ संचलित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल २८ लाख ५५ हजार २९० रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जिभाऊ शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाळेचे माजी मुख्याध्यापक ज्ञानदेव पाटील, त्यांच्या पत्नी कमल आणि सून प्रियंका या तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणूक, अपहार आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समता विद्यालय ही शासन अनुदानित शाळा असून संशयीत ज्ञानदेव पाटील हे सर्वांगीण विकास मंडळ संस्थेचे सदस्य, माजी सचिव आणि २००८ पर्यंत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. संस्थेचे पंजाब नॅशनल बँकेत वेतनेत्तर अनुदान, ज्युनिअर कॉलेज व शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा होण्यासाठी तीन स्वतंत्र बँक खाती आहेत. विशेष म्हणजे, सन २००२ पासून संस्थेत कोणतेही कायदेशीर विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही. तसेच या तिन्ही बँक खात्यांमधून रक्कमा काढण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार ज्ञानदेव पाटील यांना नव्हता. असे असतानाही, संशयीतांनी इतर सदस्यांना अंधारात ठेवून आणि दिशाभूल करून २२ जून २०२० ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बँकेच्या तीनही खात्यांमधून स्वतः पाटील, पत्नी आणि सुनेच्या नावावर तब्बल २८ लाख ५५ हजार २९० रुपये वेळोवेळी काढून घेतले आणि हा निधी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

​शासकीय निधीचा हा मोठा अपहार लपविण्यासाठी संशयीतांनी बनावट शिक्के, खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून संस्थेचे सदस्य, विद्यार्थी आणि शासनाची फसवणूक केल्याचे शेवाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद रीतीने झाल्याने शाळेच्या इतर बँक खात्यांमधूनही अशाच प्रकारे अपहार झाला असल्याचा संशय देखील शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

‘तक्रारीत तथ्य नाही’

गेल्या १५ जून रोजी न्यायालयाने याप्रकरणी केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले असताना, अवघ्या दुसऱ्याच दिवशी थेट गुन्हा दाखल होणे अनाकलनीय आहे. आमच्या विरोधातील तक्रारीत काडीचेही तथ्य नसून, सर्व आर्थिक व्यवहार पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शक झाले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून सत्य लवकरच समोर येईल आणि दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. -ज्ञानदेव पाटील (माजी मुख्याध्यापक,समता विद्यालय टेहरे)