मालेगाव : स्थानिक राजकारणातील उलथापालथी आणि शिवसेनेतील फुटीनंतर मालेगाव तालुक्यात कमकुवत झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेला पुन्हा बळकटी देण्यासह शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बैठकीस सहसंपर्कप्रमुख सुनील पाटील, धुळे लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे तसेच प्रमोद भोईर, विकास गीते, विष्णु पवार,जितेंद्र देसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना संघटन कौशल्य, पक्षाचे ध्येय-धोरण आणि समाजकारणाचा वारसा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा दाखला देत आगामी निवडणुकांसाठी जोमाने मैदानात उतरण्याचे आवाहन केले.
‘गाव तेथे शाखा’चा संकल्प
पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केल्यास चांगले यश मिळू शकते, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिवसेनेतील फुटीनंतर मालेगाव तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर अद्वय हिरे यांनीही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाची तालुक्यातील राजकीय ताकद बरीच कमी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीकडे पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा उभी करण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
‘आम जनता ठाकरे यांच्या पाठीशी’
दरम्यान, पक्षात फूट पडली असली तरी महाराष्ट्रातील आम जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केला. शिवसेनेत बंडखोरी झाल्याबद्दल जनतेमध्ये नाराजी असून आगामी निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल, असा दावाही बैठकीत करण्यात आला. शिवसैनिकांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्यावा, त्यासाठी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
