मालेगाव: कधीकाळी शेती सिंचनाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या चणकापूर धरणातील पाण्याचा मोठा वाटा कालांतराने मालेगाव शहरासाठी आरक्षित होऊ लागला आहे. यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मात्र शेतकऱ्यांमध्ये या आरक्षणाविरोधात रोष प्रकट होऊ लागला आहे. मालेगाव शहराने स्वतःच्या कोट्यातील पूर्ण पाणी गिरणा धरणातून उचलावे आणि चणकापूर धरणातील पाणी गिरणा खोऱ्यातील रब्बी पिकांसाठी किमान दोन आवर्तनांसाठी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीज्ञमागणी शेतकरी नेते प्रा.के.एन.अहिरे यांनी केली आहे.
ब्रिटिशकालीन चणकापूर धरण हे प्रामुख्याने शेती सिंचनासाठी बांधण्यात आले होते. १९८३ मध्ये मालेगावची लोकसंख्या तीन लाख असताना शहराला ३५० दलघफू पाणी मंजूर करण्यात आले होते. मात्र, आज शहराची लोकसंख्या १६ लाखांवर गेली असून, चणकापूरमधील मालेगावचे आरक्षण तब्बल १७०० दलघफू पर्यंत वाढले आहे. धरणाची एकूण क्षमता २४३० दलघफू असताना बहुतांश साठा केवळ मालेगावला पिण्यासाठी आरक्षित ठेवावा लागत असल्याने यंदा शेतकऱ्यांना रब्बीचे एकही आवर्तन मिळणे अशक्य झाले आहे.
वीज बिलाचा खर्च टाळण्यासाठी शेतकरी वेठीस
भविष्यातील गरज ओळखून शासनाने १२५ कोटी रुपये खर्चून २०१५ मध्ये गिरणा धरण ते मालेगाव अशी २७ किलोमीटरची स्वतंत्र थेट पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र, तरी देखील मालेगाव शहरासाठी गिरणा धरणाबरोबरच चणकापूर धरणाचे पाणी देखील उचलले जात आहे. यामुळे शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने नाराज असलेल्या शेतकऱ्यांकडून त्याला कडाडून विरोध केला जात आहे. १८ हजार दलघफू क्षमता असलेले गिरणा धरण यंदा १०० टक्के भरलेले आहे. महापालिकेचे तेथे १२०० दलघफू आरक्षण असतानाही केवळ वीज बिलाचा भुर्दंड टाळण्यासाठी महापालिकेकडून गिरणा धरणातून अवघे ४०० ते ४५० दलघफूच पाणी उचलले जाते. गिरणातून पाणी उपसा करण्यासाठी वीज पंपिंगचा खर्च येतो, तर चणकापूरचे पाणी नैसर्गिक उताराने विनाखर्च येत असल्याने पालिका गिरणा योजनेचा पूर्ण वापर करणे टाळत असल्याचा आरोप प्रा.अहिरे यांनी केला आहे.
चणकापूरवरील हक्क सोडण्याचे आदेश धाब्यावर
२०१२ मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत २०१५ पर्यंत गिरणा योजनेचा पूर्ण क्षमतेने वापर करून चणकापूरच्या पाण्यावरील हक्क सोडण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले होते. तरीही पालिकेकडून चालढकल सुरू आहे. महापालिकेने सोलर सिस्टीमद्वारे वीज प्रकल्प उभारावा किंवा वीज बिल सवलतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असा पर्याय प्रा.अहिरे यांनी सुचवला आहे. यंदाच्या गंभीर दुष्काळी स्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेने मालेगाव शहरासाठी गिरणा धरणातील पाणी आरक्षण वाढवून चणकापूर धरणातील आरक्षणाचा हक्क सोडून द्यावा आणि हे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रा.अहिरे यांनी दिला आहे.
