मालेगाव: तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन समिती आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त निधीतून मंजूर करण्यात आलेल्या तब्बल १०१ पाण्याच्या टँकर्स त्यांनी तालुक्याला उपलब्ध करून दिले आहेत. गुरुवारी (दि. ५) एकात्मता चौकातील पोलीस कवायत मैदानावर या टँकर्सचे लोकार्पण करण्यात आले. या टँकर्समुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसह दुर्गम वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे.

वसुबारस या मंगलपर्वाच्या मुहूर्तावर भारतीय संस्कृतीनुसार गाय-वासराचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते टँकर्सचे जलपूजन करून हिरवा झेंडा दाखवत ते ग्रामीण भागाकडे रवाना करण्यात आले. यंदा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. वार्षिक सरासरी ५६० ते ५७० मिलिमीटर पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा केवळ ३८० ते ३९० मिलिमीटर म्हणजेच सुमारे ६८ टक्के पाऊस झाला. त्यातही पावसाळ्यात मोठा खंड पडल्याने जलस्रोतांना अपेक्षित पाणी मिळाले नाही. झोडगे, वडनेर आणि दाभाडी परिसरात तर पावसाचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांच्या आत राहिले.

अपुरा पाऊस आणि भूजल पातळीतील घसरण यामुळे ऑक्टोबर महिन्यातच तालुक्यातील अनेक विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. खरीप हंगामातील नुकसानीनंतर रब्बी हंगामावरही संकट ओढवले असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीटंचाईमुळे अनेक ठिकाणी महिलांसह ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून भविष्यात ही समस्या आणखी उग्र स्वरूप धारण करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दादा भुसे यांच्या संकल्पनेतून उपलब्ध निधीचा समन्वय साधून एकाच वेळी १०१ टँकर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यास मोठा हातभार लागणार आहे. या उपक्रमामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ग्रामीण जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.या टँकर्स लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, माजी उपमहापौर नीलेश आहेर, मनोहर बच्छाव,प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी, नगरसेवक दिनेश ठाकरे, विनोद वाघ, राजेश अलिझाड यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.