नंदुरबार : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडाला असताना एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे. एकाने आरोप केल्यास त्यास लगेच प्रत्युत्तर मिळत आहे. त्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सुटले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान काही ठिकाणी नगरपरिषद दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेला नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपरोधात्मक टोला हाणला आहे.
तळोदा नगरपरिषदेसाठी एकाच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभा झाल्या. दुपारच्या सत्रात एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या सभेत त्यांनी तळोदा शहारच्या विकासासाठी तळोदा दत्तक घेण्याचे भाष्य केले. लाडकी बहीण योजना आपल्या काळातच सुरु झाली असून कोणीही आले तरी ही योजना बंद पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. . तळोदा शहरातील बारगळ जहागीरीचा प्रश्न सोडवून तळोदा शहराला या जहागीरीच्या पाशातून मुक्त करण्याचे आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या याच भाषणाचा संदर्भ घेत राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या तळोदा दत्तक घेण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली. आमचे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मांडी छोटी आहे. त्यामुळे ते किती नगरपरिषदा दत्तक घेतील, असा टोला त्यांनी हाणला..मागील १० वर्षांपासून नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे.
असे असतानाही तळोदा नगरपरिषदेंच्या विकासासाठी ते भरीव निधी देतांना कमी पडल्याचे दिसून आले आहेत. एकनाथ शिंदे यांची ही राजकीय भाषा असून त्यांनी दिलेली आश्वासने काही पूर्ण होणार नाहीत. अशी शाशंकता पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. तळोद्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेतून त्यांनी हा टोला लगावला आहे.
लाडकी बहीण योजना ही कुण्या एका पक्षाची नसून ही महायुतीमधल्या तीनही पक्षांची योजना आहे. कोणीही जिको अथवा हरो, ही योजना कशी बंद पडेल, असा प्रश्न कोकाटे यानी उपस्थित केला. तळोदा नगरपरिषदेमध्ये भाजपचे जितेंद्र सुर्यवंशी, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) हितेंद्र क्षत्रीय आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) भाग्यश्री चौधरी यांच्यात काट्याची टक्कर आहे. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्याने महायुतीमधले सर्वच घटक पक्ष आता एकमॆकांवर ताशेरे ओढून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.
