नाशिक – महाराष्ट्रात वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मनमाडने पुन्हा एक पुढचे पाऊल टाकले आहे. उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे ४ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनिअर आणि सिनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सुरु होण्याआधीच मनमाडसाठी खास ठरली आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघात मनमाडच्या सहा खेळाडुंचा समावेश करण्यात आला आहे. मनमाडसाठी ही गौरवास्पद बाब मानली जात आहे.
क्रिकेट, बॅडमिंटन यांसारख्या खेळांकडे मुलांचा आणि पालकांचाही अधिक ओढा असताना वेटलिफ्टिंगसारख्या काहीशा त्रासदायक खेळाकडे मुलांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षित करणे, खरोखरच दिव्य मानावे लागेल. त्यातही असे प्रयत्न मनमाडसारख्या ग्रामीण भागात होत असतील तर त्यांच्या या प्रयत्नांना निश्चितच दाद द्यावयास हवी. वेटलिफ्टिंग या खेळातील कामगिरीसाठी शारीरिक तंदुरुस्ती अधिक महत्वाची आहे. या खेळात दुखापतीची शक्यताही अधिक असते. तसेच अनेक मोठ्या शहरांमधील व्यायामशाळांमध्येही वेटलिफ्टिंगसाठी आवश्यक साहित्याची वानवा असते. मार्गदर्शन मिळणे तसेच योग्य प्रशिक्षकही उपलब्ध नसतो. त्यामुळे काही खेळाडुंना वेटलिफ्टिंगविषयी उत्सुकता असली तरी ते त्यापासून वंचितच राहतात.
अशा प्रतिकूल परिस्थितीत वेटलिफ्टिंग हा क्रीडा प्रकार मनमाडमध्ये रुजविणे आणि तो बहरात आणणे, अशी कामगिरी प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. अनेक वर्षांच्या कठीण परिस्थितीनंतर मनमाडमधील खेळाडू वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करु लागले आहेत. राष्ट्रकुल, एशियाड यासारख्या स्पर्धांमध्ये नजीकच्या भविष्यात मनमाडच्या वेटलिफ्टरने पदक मिळविल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखेच काहीच नाही.
मनमाडच्या खेळाडुंनी आपली दैदिप्यमान कामगिरी उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे ४ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनिअर आणि सिनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही करावी, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून होत आहे. या स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्यात आतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी, आकांक्षा व्यवहारे, राष्ट्रीय पदक विजेते कृष्णा व्यवहारे, आनंदी सांगळे, साहिल जाधव, श्रावणी पुरंदरे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करीत पदक प्राप्त करण्यासाठी मनमाडचे खेळाडू सज्ज झाले आहेत.
भारतातील विविध राज्यातील ५५० खेळाडू पुरुषांच्या आठ आणि महिलांच्या आठ विविध वजनी व वयोगटात सहभागी होणार असून स्पर्धेतील पदक विजेत्यांना आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, नगराध्यक्ष योगेश पाटील, छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन, मुख्याध्यापक संतोष भराडे, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

