नाशिक –जिल्ह्यातून मनमाड-भुसावळ हा रेल्वेमार्ग जातो. या मार्गाच्या चौथ्या रेल्वेलाईन प्रकल्पाच्या कामात प्रकल्पग्रस्तांचा रेल्वेलाईनपासून ८० मीटर जमीन संपादन करण्यास विरोध आहे. रेल्वेलाईनपासून ८० मीटर जमीन संपादन केल्यास बरेचसे शेतकरी भूमिहीन होवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी बाजू प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्यासमोर मांडली.
मनमाड-भुसावळ रेल्वेमार्गाच्या चौथ्या मार्गिकेसाठी होणाऱ्या कामात प्रकल्पग्रस्तांच्या म्हणण्यानुसार रेल्वेलाईनपासून २० मीटर जमिनीचीच आवश्यकता आहे. जेवढी हवी आहे, तेवढीच जमीन घ्यावी, जास्त जमीन घेतल्यास प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होईल, असे मनमाडजवळील नागापूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपले म्हणणे तेथील लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार यांच्यामार्फत मांडले. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस भुसावळ चौथ्या रेल्वेलाईन प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता किशोर सिंग यांच्यासह रेल्वेचे प्रमुख अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
मनमाड-भुसावळ रेल्वेमार्गाच्या चौथ्या मार्गिकेमुळे विस्थापीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी तिसरी लाईन झाली असून त्यासाठीही परिसरातील जमीन संपादित करण्यात आली आहे . नव्या चौथ्या लाईनसाठी आमच्या माहितीप्रमाणे फक्त २० मीटरची आवश्यकता असतांना रेल्वेलाईनपासून ८० मीटर जमिन संपादनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव अन्यायकारक आणि जाचक आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचा धोका त्यांनी मांडला.
जमीन संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने रेल्वेने नोकरीत सामावून घ्यावे, आवश्यकता असेल तेवढीच जमीन संपादित करावी, याबाबत आमच्यावर अन्याय झाल्यास शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आत्महत्येचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी गाढवे यांना निवेदनातून दिला आहे. प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर साहेबराव पवार, कांतीलाल खताळ, कृष्णाबाई खताळ, गौरव छाजेड, सचिन छाजेड आदी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे. तिसऱ्या लाईननंतर आता पुन्हा चौथ्या लाईनच्या भूसंपादनासाठीचा प्रश्न यामुळे पुन्हा एैरणीवर आला आहे.
