नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरु असताना प्रचारासाठी अत्यंत कमी अवधी राहिल्याने उमेदवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत आहेत. त्यामुळे जेवणाच्या वेळा चुकत आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहेत. त्यामुळे नको ते घडू लागले आहे. मनमाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटासंदर्भात अशीच एक घटना घडल्याने सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते हळहळले आहेत.
मनमाडच्या प्रभाग क्रमांक १० अ मधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. प्रचारासाठी दिवस कमी असल्याने प्रत्येक घरापर्यंत पोहचण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. सोमवारी दिवसभर प्रचार करुन आल्यानंतर ते रात्री झोपले. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
नितीन वाघमारे यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत शांतता निर्माण झाली आहे. आपला एक शिलेदार असा अचानक गेल्याने सर्वांनाच आता काय करावे, हे सुचनेनासे झाले आहे. वाघमारे यांच्या निधनाने संबंधित प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली जाण्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक निर्णय अधिकारीच याविषयी निर्णय घेतील.
मनमाडमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप, रिपाइं यांची युती आहे. शिवसेना उद्धव ठाकरे, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस हे स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. मनमाड नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकांच्या ३३ जागांसाठी २१५ उमेदवार मैदानात आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजप- शिंदेंची शिवसेना आणि रिपाइंचे योगेश पाटील हे उमेदवार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून प्रवीण नाईक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रवींद्र घोडेस्वार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शुभम चुनियान, वंचित बहुजन आघाडीचे नितीन जाधव, बहुजन समाज पक्षाचे प्रवीण पगारे यांच्यासह चार अपक्ष उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत भाजपला यश मिळाले नव्हते. शिवसेना शिंदे गटामुळे त्यांना यशाची आशा आहे. भाजपला मागील निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नव्हती.
