मनमाड – शहरापासून सहा किलोमीटरवर असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या इंडियन गॅस रिफिलिंग (बॉटलिंग) प्रकल्पातून उत्तर महाराष्ट्रासह इतर काही जिल्ह्यांमध्ये दररोज ९५ ते १०५ मालमोटारींव्दारे घरगुती गॅस सिलेंडरचे पुरवठा केले जाते. मंगळवारी ही संख्या ४० मालमोटारींपर्यंत आली. यामुळे गॅस वितरणात जवळपास ६० टक्क्यांची घट झाल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युध्दजन्य परिस्थितीचे पडसाद देशातही उमटू लागले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण काही दिवसांपासून थांबविण्यात आल्याने हॉटेल, खानावळ, खाद्य व्यावसायिक तसेच उद्योग क्षेत्रात चिंता वाढली आहे. पेट्रोल, डिझेल हेही मिळणार नसल्याची धास्ती नागरिकांना वाटत असल्याने त्यांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या आहेत. त्याचप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरही पूर्वीपेक्षा विलंबाने मिळू लागल्याने ग्राहक धास्तावले आहेत.
सिलेंडर मिळण्यासाठी ग्राहकांनी वितरकांकडे रांगा लावल्या आहेत. नाशिक येथील औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांकडे केवळ तीन ते चार दिवस पुरेल इतकाच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरसंदर्भात ही परिस्थिती असताना घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यातही विलंब होऊ लागल्याने ग्राहकांनी वितरकांकडे नंबर लावण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचा नंबर लागतो, त्यांनाही २५ ते २६ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
अशी स्थिती असताना येथील इंडियन ऑइल कंपनीच्या इंडियन गॅस रिफिलिंग (बॉटलिंग) प्रकल्पातून उत्तर महाराष्ट्रासह इतर काही जिल्ह्यांना होणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्यात मंगळवारी अचानक मोठी घट झाली. प्रशासन आणि कंपनीकडून मात्र घरगुती गॅस सिलेंडराच पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात गॅसची मागणी तुलनेने कमी असल्यामुळे वितरणात काही प्रमाणात कपात करण्यात आल्याचे कंपनी प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नागरिकांना गॅस टंचाई नसल्याचे सांगून दिलासा देत असले तरी प्रत्यक्षात अनेक ग्राहकांना सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. वितरणात घट होण्यामागील नेमके कारण स्पष्टपणे सांगितले जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
वाहतूकदार आणि वितरकांकडून जेवढी मागणी येते, तेवढा पुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यामुळे गॅसची मागणी कमी असल्याने वितरणात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे. – शिरीष राव (व्यवस्थापक, इंडियन ऑइल कंपनीचा गॅस बॉटलिंग प्रकल्प, मनमाड)
