धुळे : मनमाड–इंदूर नवीन रेल्वेमार्गासाठी प्रस्तावित असलेल्या बोगद्यांच्या निर्मितीपूर्वी करण्यात आलेल्या भूगर्भीय अभ्यासातून या संपूर्ण परिसराच्या जमिनीखालील रचनेचे वेगळेच चित्र समोर आले आहे. हा प्रदेश दख्खनच्या ज्वालामुखीय खडकांच्या क्षेत्रात येत असल्याने जमिनीखाली वेगवेगळ्या जाडीचे, वेगवेगळ्या अवस्थेत झीज झालेले आणि एकापाठोपाठ एक पसरलेले बेसाल्ट खडकांचे थर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बोगद्यांच्या खोदकामात केवळ कठीण खडकांनाच सामोरे जावे लागणार नसून, काही ठिकाणी कमकुवत, भेगा पडलेल्या आणि पाण्याचा संभाव्य प्रवाह असलेल्या भूस्तरांचाही विचार करावा लागणार आहे.
हैदराबाद येथील राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेच्या (सीएसआयआर-एनजीआरआय) प्राथमिक अहवालातून ही महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. दख्खनच्या पठाराचा मोठा भाग प्राचीन ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकांनी व्यापलेला आहे. या प्रक्रियेत लाव्हारसाचे एकावर एक थर साचून खडकांची निर्मिती झाली. कालांतराने हवामान, पाणी आणि भूगर्भातील हालचालींमुळे या खडकांची वेगवेगळ्या प्रमाणात झीज झाली. परिणामी, काही थर आजही अत्यंत कठीण आणि अखंड स्वरूपात आहेत, तर काही ठिकाणी खडकांमध्ये भेगा, सांधे आणि झीज झाल्याचे आढळते. मनमाड–इंदूर रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बोगद्यांच्या परिसरातही अशाच प्रकारची संमिश्र भूगर्भीय रचना असल्याचे प्राथमिक अभ्यासातून दिसून आले आहे.
३० ते ३५ मीटर खोलीवर बोगद्याचा मार्ग!
या अहवालातील आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे धुळेजवळील बोगदा क्रमांक दोनसाठी प्रस्तावित खोदकामाची खोली. संबंधित भूगर्भीय छेदानुसार बोगद्याची खोली साधारणतः ३० ते ३५ मीटर राहणार आहे. काही ठिकाणी या खोलीवरील खडकांमध्ये ४०० ओहम-मीटरपेक्षा अधिक विद्युत प्रतिरोधकता आढळली आहे. यावरून संबंधित भागातील खडक घन, मजबूत आणि तुलनेने कमी झीज झालेले असल्याचे सूचित होते. या खोलीवर पाण्याचा प्रवाह होऊ शकेल अशा मोठ्या भेगा किंवा ठळक कमी प्रतिरोधकतेचे पट्टे आढळले नसल्याचेही अहवालात नमूद आहे. त्यामुळे या विशिष्ट भूगर्भीय पट्ट्यात बोगद्याच्या खोदकामासाठी तुलनेने अनुकूल परिस्थिती असल्याचे संकेत मिळतात.
सेंधवा परिसरात मात्र भूस्तरांचे वेगळे स्वरूप!
धुळे परिसरातून उत्तरेकडे सेंधव्याच्या दिशेने जाताना भूगर्भीय रचनेत पुन्हा विविधता दिसून येते. बोगदा क्रमांक तीन आणि चारच्या परिसरातील काही ठिकाणी जमिनीखालील थरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल आढळले आहेत. काही ठिकाणी विद्युत प्रतिरोधकता असलेले घन आणि अखंड बेसाल्ट खडक किंवा कोरडे ज्वालामुखीय शिलाखंड आढळतात. त्याखाली झीज झालेल्या खडकांचे थर आहेत.
नर्मदा–तापी खोऱ्यांतील गाळाचाही परिणाम
या रेल्वेमार्गाच्या काही भागांत पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेला गाळाचा पट्टा आढळतो. नर्मदा किंवा तापी नदीच्या खोऱ्यांमधून वाहून आलेल्या गाळाचे संचयन या भागात झालेले असण्याची शक्यता अहवालात नमूद आहे. त्यामुळे या ठिकाणी जमिनीवरील माती आणि गाळाच्या थराची खोली, त्याखालील बेसाल्ट खडकांची मजबुती तसेच पाण्याचा निचरा आणि संभाव्य गळती यांचा विचार करणे आवश्यक ठरणार आहे.
एकूणच, धुळे आणि सेंधवा परिसरातील भूगर्भीय रचना एकसमान नसून, काही ठिकाणी अभेद्य स्वरूपाचे कठीण बेसाल्ट खडक, तर काही ठिकाणी झीज झालेले आणि भेगा पडलेले खडकांचे थर असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रस्तावित बोगद्यांची निर्मिती करताना प्रत्येक ठिकाणच्या भूगर्भीय परिस्थितीनुसार खोदकामाचे तंत्र, आधारव्यवस्था आणि पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन करावे लागणार आहे. जमिनीच्या वरून दिसणाऱ्या डोंगररांगांच्या पोटात दडलेल्या या खडकांच्या थरांचा अचूक वेध घेणे, हेच मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पातील बोगदा निर्मितीसमोरील अभियांत्रिकीचे मोठे आव्हान ठरणार आहे. तथापि या संदर्भात अधिकृत माहीती देण्यास संबंधित यंत्रणा अद्यापतरी पुढे आलेली नाही.
