धुळे : मनमाड ते इंदूर दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे मार्गासाठी अखेर भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली असून, रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वे विभागाने शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील नरडाणा ते थेट मध्य प्रदेश सीमेपर्यंतच्या २२ गावांतील जमिनीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही अधिसूचना आज (दि.१२) शासकीय राजपत्रात जाहीर करण्यात आली आहे.

या अधिसूचनेनुसार हा विशेष रेल्वे प्रकल्प मनमाड ते न्यू धुळे तसेच नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर दरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जाणार असून, एकूण ३०९.४३ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गांतर्गत महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील बडवाणी, खरगोन, धार आणि इंदूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन संपादन करण्याचा केंद्र सरकारचा मानस स्पष्टपणे जाहीर करण्यात आला आहे.

अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित जमिनीत स्वारस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत हरकत नोंदविता येणार आहे. या हरकती लेखी स्वरूपात सक्षम प्राधिकरणाकडे सादर कराव्या लागतील. हरकतीत कारणे स्पष्ट नमूद करणे आवश्यक असून, संबंधित व्यक्तीस प्रत्यक्ष किंवा कायदेशीर प्रतिनिधीमार्फत आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. या प्रकरणात शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी यांची सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यक वाटल्यास सक्षम प्राधिकरणाकडून पुढील चौकशी करण्यात येऊन हरकत मंजूर किंवा नामंजूर करण्याबाबत आदेश दिला जाणार असून, हा आदेश अंतिम राहणार आहे. अधिसूचनेअंतर्गत येणाऱ्या जमिनीचे नकाशे व सविस्तर तपशील संबंधित व्यक्तींना सक्षम प्राधिकरणाच्या कार्यालयात पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील एकूण २२ गावांमधील, संरचना असो वा नसो, अशा जमिनी या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या प्रक्रियेत भूसंपादन कायद्यातील तरतुदींनुसार सर्वेक्षण, मोजणी आणि मोबदला निश्चित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाशी संबंधित शासकीय फाइल संदर्भ समोर आला असून, त्यामध्ये दाबिलसह परिसरातील गावांचा समावेश असल्याचे स्पष्ट होते. रेल्वेच्या निर्माण विभागामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, मुख्य प्रशासनिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय कामकाज सुरू आहे. मनमाड–इंदूर नवीन रेल्वे मार्ग हा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून, व्यापार, उद्योग आणि दळणवळणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या भूसंपादनाचा टप्पा निर्णायक मानला जात असून, या प्रक्रियेतील पुढील घडामोडींकडे संबंधित नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या अधिसूचनेमुळे संबंधित गावांतील शेतकरी व जमीनधारकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नागरिकांनी प्रकल्पामुळे परिसराचा विकास होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि दळणवळण अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, काही शेतकरी वर्गाने मोबदल्याबाबत पारदर्शकता ठेवावी, शेती व राहत्या घरांवर होणारा परिणाम लक्षात घ्यावा, अशी मागणीही केली आहे. भूसंपादन प्रक्रियेत कायद्यानुसार सर्व बाबींची पूर्तता करण्यात येणार असून, सर्वेक्षणानंतर जमीनधारकांशी चर्चा करून मोबदला निश्चित केला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शेती, घरे, विहिरी, झाडे आणि इतर संरचनांचा विचार करून भरपाई दिली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात भूसंपादन पूर्ण होताच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. नवीन रेल्वे मार्गामुळे धुळे जिल्हा थेट मध्य प्रदेशातील औद्योगिक व व्यापारी केंद्रांशी जोडला जाणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पाशी संबंधित निर्णय आणि अंमलबजावणीवर सर्वांचे लक्ष केंद्रित राहणार आहे.