मालेगाव : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी शासन पातळीवरून सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेस शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहित केल्या जाणार असलेल्या मालेगाव तालुक्यातील १६ गावांमधील शेतकरी त्या विरोधात एकवटले आहेत. या जमिनींसाठी शासनाकडून दिला जाणारा मोबदला अल्प आहे,असा रोष व्यक्त करत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी मालेगाव-पुणे महामार्गावर चोंढी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. गेल्या पंधरा दिवसात या प्रश्नी शेतकऱ्यांनी केलेले हे दुसरे आंदोलन आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर-रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने अलीकडेच मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील एकूण ६ जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. यात महाराष्ट्रातील नाशिक व धुळे तसेच मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन, धार व इंदूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी मालेगाव तालुक्यातील १६ गावांमधील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून प्रत्यक्षात जमीन मोजणी सुरू झाली होती. मात्र या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याला हरकत घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाला ही मोजणी प्रक्रिया थांबवावी लागली आहे.
या प्रकल्पासाठी शासनाकडून प्रति हेक्टरी केवळ ७ ते ८ लाख रुपये जमिनीचा मोबदला दिला जाणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ही रक्कम सध्याच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे नाही आणि ती अत्यंत तुटपुंजी असल्याने शेतकरी देशोधडीला लागतील, अशी तक्रार केली जात आहे. तसेच हेक्टरी किमान १ कोटी ६० लाख रुपयांचा मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
माफक मोबदल्यासोबतच, बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे तसेच विहिरी, फळबाग,घरे असलेल्या जमिनीचे अधिग्रहण झाल्यास त्याचा वाढीव स्वरूपात मोबदला द्यावा, असा आंदोलक शेतकऱ्यांचा आग्रह आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासन पातळीवरून दांडगाई करून या जमिनी अधिगृहीत केल्या जात असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर योग्य मोबदला द्यावा,या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी येथील राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर पहिल्यांदा रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा भूसंपादन अधिकारी रवींद्र भारदे यांनी आंदोलक व रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. जमिनीचा अल्प मोबदला देऊन शासन फसवणूक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी बैठकीत केला होता. तर,शेतकऱ्यांना नियमानुसार जमिनीचा मोबदला दिला जाईल, अशी हमी भारदे यांनी बैठकीत दिली. मात्र शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरली.
या प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी मालेगाव-पुणे महामार्गावरील जळगाव चोंढी येथे शनिवारी पुन्हा रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. निवासी नायब तहसीलदार युवराज परचुले व भूसंपादन कार्यालयाचे अधिकारी जगदीश निकम यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार, मच्छिंद्र बिडगर, देवाजी अहिरे, साहेबराव पाटील आदी सामील झाले होते.
