धुळे, बहुप्रतीक्षित ३०९ किलोमीटर लांबीच्या मनमाड – इंदूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील एकूण ३४९.७८९ हेक्टर वनजमिनीची आवश्यकता निश्चित करण्यात आली असून, संबंधित वनजमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे संभाव्य अडथळे दूर होऊन या कामास लवकरच चालना मिळणार असल्याचा दावा मनमाड–इंदूर रेल्वे संघर्ष समितीतर्फे करण्यात आला आहे.
समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हा रेल्वे प्रकल्प निमाड, मालवा आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. वनजमिनीसंदर्भातील आवश्यक प्रस्ताव व कागदपत्रांची प्रक्रिया पुढे सरकत असल्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
महाराष्ट्र, गुजरातमध्ये एवढी जमीन
प्रकल्पासाठी महाराष्ट्रात साधारणपणे १४२.४८६७ हेक्टर वनजमिनीची आवश्यकता असून, त्यापैकी नाशिक जिल्ह्यात १३.८२४७ हेक्टर आणि धुळे जिल्ह्यात जवळपास १२८.६६२० हेक्टर वनजमीन प्रस्तावित आहे. तसेच मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यात सरासरी १४.६६८० हेक्टर, खरगोन जिल्ह्यात ३१.०८०७ हेक्टर, धार जिल्ह्यात ७६.४५०३ हेक्टर आणि बडवानी जिल्ह्यात साधारणपणे ६५.२११० हेक्टर वनजमिनीची आवश्यकता निश्चित करण्यात आली आहे.
महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग
हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर इंदूर, धार, बडवानी, खरगोन, धुळे, नाशिक आणि मनमाड या शहरांना थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. तसेच शेती, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक संबंध अधिक बळकट होतील.
समितीच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय, वन व पर्यावरण मंत्रालय तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश शासनाला वनजमिनीच्या मंजुरीसह सर्व उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकर सुरुवात करण्याची मागणी केली. मनमाड–इंदूर रेल्वे संघर्ष समिती प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवून असून, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे अशी माहिती यानिमित्त समितीच्या वतीने मनोज मराठे यांनी दिली.
वनजमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बहुप्रतीक्षित रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक वेग मिळेल आणि मनमाड–इंदूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.
