धुळे : मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मनमाड–इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला गेल्या वर्षभराच्या खंडानंतर आता कुठे अपेक्षित गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या भागात जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात झाली असून पीथमपूर परिसरातील काही गावांची अधिग्रहण यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच सेंधवा–वरला परिसरातील गावांची यादी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मनमाड–इंदूर रेल्वे संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी या संदर्भात राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांची भेट घेऊन मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा भागात जमीन अधिग्रहण प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिग्रहण प्रक्रिया गतीमान करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. १८ डिसेंबर २०२४ रोजी मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणासंदर्भात राजपत्र प्रसिद्ध झाले होते; मात्र हे काम काही कारणांमुळे खोळंबले होते. आता अडथळे जवळपास दूर झाल्याने धार जिल्ह्यात अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

यासंदर्भात मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धार जिल्ह्यातील पीथमपूर तहसील अंतर्गत आठ गावांची अधिग्रहण यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रानीतलाई, चंदौलीपूरा, दियाघाटीपूरा, अवलीपूरा, देवरिया, जलवाय, बेडवापूरा आदी गावांचा समावेश असून एकूण शेकडो शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात येत आहे. याशिवाय मनावर तहसीलमधील धरमपुरी परिसरातील नागसिटी, लुन्हेरा खुर्द, पेटलावद, भिक्रोता, धन्या, ग्यासपूरा, खेड़ी, एकलरा, दुधी, भोदल, चिकल्या वाडी, दुगनी, कोडिडा, चौकी, भरुडपूरा (बीके) आदी गावांतील जमिनींचेही अधिग्रहण करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, निमाड विभागातील मनमाड–इंदूर रेल्वे संघर्ष समितीचे सक्रिय सदस्य कैलाश पाटीदार यांनी धार जिल्ह्यातील उर्वरित अधिग्रहण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक खासदार तसेच केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहणासोबतच शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र मध्यप्रदेशात अद्याप अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे संपूर्ण प्रकल्पाच्या कामात विलंब होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रकल्पाच्या कामाला गती देणे आवश्यक असल्याचेही पाटीदार यांनी नमूद केले.

या अनुषंगाने मध्यप्रदेशात मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियेला अखेर गती मिळताना दिसत आहे. धार जिल्ह्यातील काही गावांची अधिग्रहण यादी जाहीर झाल्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी रखडण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र आता अधिग्रहण प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाल्याने प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग काहीसा मोकळा होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

धार जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उर्वरित गावांची यादीही लवकरच जाहीर होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे मनमाड–इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी अधिग्रहणाबरोबरच मोबदला वितरणाची प्रक्रिया सुरू असताना आता मध्यप्रदेशातही प्रक्रिया पुढे सरकत असल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी वातावरण अनुकूल होत असल्याचे मानले जात आहे.