धुळे : मनमाड–इंदूर नव्या ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मध्य रेल्वेने मध्य प्रदेशातील सेंधवा (वनिहार) ते ग्यासपूरखेडी (धामनोद) या सुमारे ७५.५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या टप्प्यासाठी सुमारे २,५४८.३७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून रेल्वेमार्ग, बोगदे, मोठे पूल, विद्युतीकरण, आधुनिक सिग्नल व्यवस्था आणि अन्य अभियांत्रिकी कामांचा त्यात समावेश आहे. हे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यासह संपूर्ण मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
मनमाड–इंदूर रेल्वेमार्ग हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. धुळे जिल्ह्यातील प्रस्तावित नव्या धुळे (बोरविहीर) स्थानकापासून पुढे मध्य प्रदेशातील सीमाभागापर्यंत रेल्वे संपर्क निर्माण होणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील उद्योग, शेतीमालाची वाहतूक, व्यापार आणि प्रवासी सुविधा यांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ही निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदापूर्व बैठक ३१ डिसेंबर २०२६ रोजी होणार असून, निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १८ मार्च २०२७ निश्चित करण्यात आली आहे. तांत्रिक निविदा १९ मार्च २०२७ रोजी उघडण्यात येणार आहे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाचे विविध टप्प्यांत विभाजन करून अनेक ठिकाणी एकाच वेळी बांधकाम सुरू करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. या प्रकल्पातील अभियांत्रिकी कामांसाठी वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (हैदराबाद) भूगर्भीय तपासणी केली आहे. धुळे, सेंधवा, आबू घाट परिसर तसेच प्रस्तावित बोगद्यांच्या परिसरात अनेक ठिकाणी चाचण्या करण्यात आल्या. प्राथमिक अहवालानुसार बहुतांश बोगदे कमी खोलीतील बेसॉल्ट खडकातून जाणार असले तरी काही भागांत कमकुवत खडक व पाण्याच्या झिरपण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष तांत्रिक उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील प्रस्तावित नव्या धुळे (बोरविहीर) स्थानकापासून नरडाणामार्गे मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू असलेल्या भूसंपादन, मोजणी आणि अन्य प्रशासकीय प्रक्रियांनाही या निविदेमुळे अप्रत्यक्ष गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मनमाड–इंदूर रेल्वेमार्गाचा महाराष्ट्रातील टप्पा पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्याला थेट मध्य भारताशी जोडणारा नवा रेल्वे दुवा उपलब्ध होईल, असा विश्वास रेल्वे अभ्यासक व्यक्त करीत आहेत. या नव्या निविदेमुळे मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पाचा मध्य प्रदेशातील टप्पा प्रत्यक्ष बांधकामाच्या दिशेने सरकत असताना, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील कामांच्या प्रगतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः प्रस्तावित नवे धुळे (बोरविहीर) स्थानक, भूसंपादन, पूल, बोगदे आणि इतर पायाभूत सुविधांची कामे नियोजित वेळापत्रकानुसार पुढे गेल्यास उत्तर महाराष्ट्राला मध्य प्रदेशमार्गे देशाच्या मध्य आणि उत्तर भागाशी अधिक जलद रेल्वे संपर्क मिळू शकतो. त्यामुळे हा केवळ एका राज्यातील रेल्वेमार्गाचा टप्पा नसून महाराष्ट्राच्या विकासालाही नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार का, याबाबत आता सर्वांचे लक्ष रेल्वे प्रशासनाच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.
परिसरातील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने पुढे जात आहे यामुळे आम्ही आनंद व्यक्त केला. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि आवश्यक मंजुरी प्रक्रियेवर समिती लक्ष ठेवणार असून, बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी समितीचा पाठपुरावा सुरू राहील असे मनमाड-इंदूर रेल्वे संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे म्हणाले.
