मनमाड – नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे महत्वाचे रेल्वे जंक्शन स्टेशन आहे. मनमाड रेल्वे स्थानक आणि मनमाडजवळील नांदगाव रेल्वे स्थानकांमध्ये सध्या कामांना वेग आला आहे. या कामांचा रेल्वे प्रवाशांना लाभ होणार असून रेल्वे स्थानकात प्रवेश करताच त्यांना आरामदायी आणि प्रसन्नतेची अनुभूती मिळणार आहे.

कोणत्याही रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर अस्वस्छता अधिक असते. त्यामुळे रेल्वे स्थानकात अधिक वेळ बसणे किंवा उभे राहणे प्रवाशांसाठी कठीण जाते. फलाटांवर पडलेली घाणही अनेक स्थानकांमध्ये लवकर स्वच्छ केली जात नाही. या सर्व पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि नांदगाव या रेल्वे स्थानकांमध्ये काही कामे करण्यात येत आहेत. रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा यासाठीही उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. मनमाड आणि नांदगाव या रेल्वे स्थानकांमध्ये सुरु असलेल्या कामांची भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी पाहणी केली.

नाशिक, मनमाड विभागात ट्रेन क्रमांक ११११३ च्या फुटप्लेटची निरीक्षणाद्वारे पाहणी केली. या दरम्यान लोको पायलट आणि सहायक लोको पायलट यांची वाहन चालन पद्धती, सिग्नल पालन तसेच कर्मचाऱ्यांची सतर्कता यांचा आढावा घेण्यात आला. सुरक्षितता नियमांचे काटेकोर पालन, दक्षता आणि कार्यशिस्त राखून सुरक्षित व वेळेत गाड्यांचे संचालन करण्यावर विशेष भर देण्यात आला.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच विविध शाखांचे वरिष्ठ अधिकारी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती पाहण्यासाठी मनमाड स्थानकाची पाहणी केली. या तपासणीमध्ये कामांची गुणवत्ता, वेळापत्रक तसेच प्रवासी-केंद्रित सुधारणा जसे की सुविधा, सुलभता, स्वच्छता आणि स्थानकाचा एकूण सौंदर्यात्मक विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रवाशांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करताना सुरक्षा व गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मनमाड-भुसावळ विभागात विंडो ट्रेलिंग निरीक्षणही केले. या दरम्यान सुरू असलेली विकासकामे, ट्रॅकची दुरुस्ती, स्थानकांची स्थिती, ओएचई (विद्युत वाहिनी), लेव्हल क्रॉसिंग तसेच इतर महत्त्वाच्या सुरक्षा पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

नांदगाव रेल्वे स्थानकाची पाहणी करतांना सर्क्युलेटिंग एरिया, बुकिंग कार्यालय, मालगोदाम (गुड्स शेड), स्टेशन पॅनल रूम, रनिंग रूम आणि क्रू लॉबी यांची तपासणी करण्यात आली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेताना गुणवत्ता, सुरक्षा आणि वेळेत अंमलबजावणीवर भर देण्यात आला, ज्यामुळे प्रवासी सुविधा आणि कार्यक्षमता अधिक सुधारता येईल. या निरीक्षण दरम्यान संबंधित स्थानकाचे स्थानक व्यवस्थापक, पर्यवेक्षक सहभागी होते.