जळगाव : शहरात तसेच संपूर्ण जिल्ह्यात मराठा समाजाची लोकसंख्या लक्षणीय असतानाही महापौर पदावर या समाजाला आजवर केवळ एकदाच संधी मिळाल्याचे वास्तव आहे. यंदाच्या महापौर निवडीत तरी मराठा समाजाचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात भाजप नेतृत्वाने मराठा समाजाऐवजी लेवा समाजातील उमेदवाराला प्राधान्य दिल्याने या समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.

जळगाव महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली असता, लेवा समाजाला सर्वाधिक सहा वेळा महापौरपद भूषविण्याची संधी मिळाल्याचे चित्र समोर येते. त्या खालोखाल कोळी समाजाला चार वेळा, मारवाडी समाजाला तीन वेळा, तर तडवी आणि हटकर समाजाला प्रत्येकी एक वेळा महापौरपदाची संधी मिळाली आहे. मात्र, तुलनेत मराठा समाजाचे प्रतिनिधित्व अत्यल्प राहिल्याने यावेळी भाजपने सामाजिक समीकरणांचा विचार करावा, अशी अपेक्षा विविध स्तरांतून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जळगावच्या राजकारणात महाजन यांचा प्रभाव मोठा असून महापौरपदाचा अंतिम निर्णय त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असतो, असे राजकीय वर्तुळात मानले जाते. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवता, भाजपकडून यावेळी ‘मराठा कार्ड’ खेळले जाईल, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात होती.

भाजपच्या अडचणी वाढणार ?

मराठा समाजाचे प्रतिनिधित्व वाढविण्याची संधी भाजपसमोर असतानाही, प्रत्यक्षात यंदा भाजपने लेवा समाजालाच प्रथम प्राधान्य देण्याची भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाच्या अपेक्षांना दुय्यम स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापौरपदासाठी मराठा समाजातील काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत असतानाही, अंतिम निर्णय मात्र लेवा समाजाच्या बाजूने गेला आहे. भाजपच्या या भूमिकेमागे परंपरागत मतदारसंघीय गणिते, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील सामाजिक समीकरणे कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मराठा समाजात या निर्णयामुळे नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी भाजपसाठी कितपत अडचणीची ठरेल, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

भविष्यातील राजकारणावर परिणाम ?

एकीकडे सामाजिक समतोल साधण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना, दुसरीकडे पारंपरिक राजकीय गणितांनाच भाजपकडून प्राधान्य देण्यात आल्याचे या निर्णयातून दिसून येते. त्यामुळे भाजपचा हा निर्णय भविष्यातील राजकारणावर काय परिणाम घडवून आणतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महापालिकेतील भाजपचे अनेक नगरसेवक मराठा समाजातून निवडून येतात. तरीही नेतृत्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त केली जात आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर पदासाठी लेवा समाजाला झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मराठा समाजातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. विशेष म्हणजे, मराठा समाजाने वर्षानुवर्षे भाजपला एकनिष्ठ पाठिंबा दिला आहे.