scorecardresearch

Premium

नाशिक: मराठा-ओबीसी समीकरण; भाजप शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्षपदी शंकर वाघ

भाजपने शहरासह जिल्ह्यात संघटनात्मक बदल करताना मराठा आणि ओबीसी व्यक्तींना प्राधान्य देत जातीय समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP City President Prashant Jadhav
भाजप नाशिक शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने शहरासह जिल्ह्यात संघटनात्मक बदल करताना मराठा आणि ओबीसी व्यक्तींना प्राधान्य देत जातीय समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक शहराच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत जाधव तर, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शंकर वाघ आणि सुनील बच्छाव तसेच मालेगावची जबाबदारी नीलेश कचवे यांच्यावर सोपविण्यात आली. या नियुक्तीत निष्ठावंतांना संधी देताना मागील काही वर्षात नव्याने दाखल झालेल्यांचा विचार केला गेलेला नाही.

Five guardian ministers Gondia district
गोंदिया जिल्ह्यात चार वर्षांत पाच पालकमंत्री!
Mumbai Monsoon Latest Update
Weather Update: हवामान विभागाकडून आज, उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट
prakash-ambedkar
राज्यात मैत्री अन् अकोला जिल्ह्यात कुरघोडी, स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव
sangli bjp, sangli district bjp, bjp executive committee for sangli district
सांगली : भाजपची ९० जणांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने शहर आणि ग्रामीण पक्ष संघटनेत महत्वाचे फेरबदल केले आहेत. यापूर्वी भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी गिरीश पालवे सांभाळत होते. मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यांना दोनवेळा मुदतवाढ दिली गेली. शहराध्यक्ष पदासाठी स्थानिक पातळीवर मोठी चुरस होती. त्यात पक्ष संघटनेत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंतांसह मागील काही वर्षात दाखल झालेल्यांचाही समावेश होता. वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून या पदावर वर्णी लावण्यासाठी काही मातब्बरांनी प्रयत्न केले होते. परंतु, त्यांचा भ्रमनिरास झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहर व जिल्ह्यातील नियुक्या जाहीर केल्या. निवडणुकीत जातीय समीकरणे जुळविण्याच्या दृष्टीने पक्षाने ओबीसी, मराठा घटकाला संधी देण्याची दक्षता घेतली आहे.

आणखी वाचा-नाशिक: ॲपलच्या बनावट भ्रमणध्वनी साहित्याची विक्री, पाच विक्रेत्यांवर कारवाई

नाशिक शहराध्यक्ष आणि ग्रामीणचे एक जिल्हाध्यक्षपद ओबीसी समाजाकडे देताना ग्रामीणमधील दोन जिल्हाध्यक्षपद मराठा समाजाला देण्यात आली आहेत. शहर कार्यकारिणीत सलग दोन वेळा संघटन सरचिटणीस म्हणून काम करणाऱ्या प्रशांत जाधव यांची नाशिक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जाधव हे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक होते. त्यांच्या निवडीने पक्षांतर्गत मतभेद उफाळून येणार नाहीत हे लक्षात घेऊन ही नियुक्ती झाल्याचे सांगितले जाते. निवड जाहीर झाल्यानंतर पक्षातील नेते, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कार्यालयात दाखल होत त्यांचे अभिनंदन केले. एकदा सर्वानुमते निवड झाल्यानंतर पदासाठीची स्पर्धा आपोआप संपुष्टात आल्याचे जाधव यांनी सांगितले. शहरात १०९५ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रासाठी ३० जणांची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येक केंद्रावरील एक कार्यकर्ता ६० घरांच्या संपर्कात आहे. मतदान केंद्रस्तरीय यंत्रणेमार्फत पक्षाचे कार्यक्रम, नऊ वर्षातील मोदी सरकारचे काम नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये ही यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याचा मनोदय जाधव यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-नाशिक: सिटीलिंक रडतखडत रस्त्यावर, देयके रखडल्याने बस पुरवठादार सेवा थांबविण्याची शक्यता

नाशिक ग्रामीण (दिंडोरी) अध्यक्षपदी शंकर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. शहर व ग्रामीणच्या महत्वाच्या या दोन पदांवर ओबीसी समाजाला संधी देताना जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न झाला आहे. नाशिक ग्रामीणच्या (दक्षिण) अध्यक्षपदी सुनील बच्छाव तर मालेगावच्या अध्यक्षपदी नीलेश कचवे यांची नियुक्ती तेच दर्शवित आहे. पक्ष संघटनेत हे सर्व पदाधिकारी आधीपासून कार्यरत होते. अन्य पक्षांतून आलेल्यांना स्थानिक पातळीवरील प्रमुख संघटनात्मक पदे न देण्याचे धोरण पक्षाने ठेवल्याचे दिसत आहे.

नाराजवंतांवर लक्ष

शहराध्यपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रशांत जाधव हे दिवसभर भाजपच्या पक्ष कार्यालयात थांबले होते. प्रत्यक्ष भेटून आणि भ्रमणध्वनीवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. शहराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत अनेक जण होते. या निवडीतून कोण नाराज झाले, यावर भाजपचे लक्ष आहे. पक्ष कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी कोण आले, कोण आले नाहीत, याचा तपशील कळत, नकळतपणे संकलित केला जात होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maratha obc equation bjp city president prashant jadhav district president shankar wagh in nashik mrj

First published on: 20-07-2023 at 12:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×