नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले असताना, त्यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधातील अस्वस्थता सकल मराठा समाजातून उमटू लागली आहे. नाशिकमध्ये मंत्री विखे-पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर सकल मराठा समाजाच्या एका गटाने जागरण-गोंधळ घालून अनोखे आंदोलन केले. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटील आणि मनोज जरांगे यांनी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उंटवाडी भागातील मंत्री विखे-पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. क्रांती मोर्चाचे करण गायकर, नानासाहेब बच्छाव, शिवाजी मोरे यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. ९ ऑक्टोबरपासून १० टक्के एसईबीसी आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत आहे. सरकारने यासाठी कोणती तयारी केली आहे, याची माहिती समाजाला द्यावी आणि आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच दहा टक्के आरक्षणासोबत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवरही सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने द्यावा, प्रत्येक जिल्ह्यात किमान ५०० विद्यार्थी क्षमतेची वसतिगृहे उभारावीत, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच कोपर्डी प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी, यासाठी शासनाने आवश्यक कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
जरांगे, विखे-पाटील यांच्यावर टीका
मागील तीन वर्षांत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सातत्याने बदलल्या. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि मनोज जरांगे यांनी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत करण गायकर यांनी मंजूर झालेल्या मागण्यांची माहिती उभयतांनी समाजासमोर मांडावी, असे आव्हान दिले. उपसमितीचे अध्यक्ष निद्रिस्त असून त्यांना जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे गायकर यांनी नमूद केले. अंतरवली सराटी येथे आंदोलन झाले की उपसमितीचे अध्यक्ष जागे होतात. मराठ्यांना टेंडरच्या प्रक्रियेत अडकवून समाजाचा घात करण्यापेक्षा मंत्री विखे-पाटील यांनी आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा वापर मराठा समाजाच्या प्रगतीसाठी करावा. आता समाजाला आश्वासने नकोत, तर निर्णय आणि प्रत्यक्ष कृती हवी, असे गायकर यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी ‘ट्रोलर गँग’ला आवर घालावा. माता-भगिनींना काही जणांकडून ट्रोल केले जात असून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका-टिप्पणी केली जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
