नाशिक: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर होणाऱ्या सभा आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावसाठी होणारे मेळावे, या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान अथवा जाती -जातींमध्ये तेढ निर्माण करणारे प्रयत्न समाज माध्यमातून होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील आणि वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक समीर बारावकर यांनी केले आहे.
गावोगावी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी नागरिकांनी प्रयत्न करण्याची गरज असून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांवर लक्ष केंद्रित करण्याचे काम करावे, समाज माध्यमातून येणाऱ्या संदेशांकडे दुर्लक्ष करून दोन समाजात वाद होणार नाही, अशी भूमिका इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनही पाटील आणि बारावकर यांनी केले आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रविरोधी प्रयत्न करणाऱ्यांची कायद्याने गय केली जाणार नाही.
हेही वाचा… राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार; फैजपूरमध्ये शालेय शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
शहरातील व ग्रामीण भागातील समाज माध्यमावरील गटांमध्ये कोणताही समाज, जातीबद्दल संदेश पसरविण्यात येणार नाही, यावर पोलीस प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे लक्ष राहणार आहे. गावोगावी येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना गाव बंदी अथवा वाईट बोलणे, जातीय संदेश पसरविणे कायद्याने गुन्हा ठरवला जाईल. युवकांनी कोणत्याही परिस्थितीत आपले कुटुंब व आपले भविष्य समाजकंटकांमुळे वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपले गाव आणि परिसरात अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना करण्यासाठी कोणी पुढाकार घेत असल्यास त्याचा भ्रमणध्वनीवर फोटो काढून थेट स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, पोलीस यंत्रणेकडून संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक पाटील आणि सहायक निरीक्षक बारावकर यांनी केले आहे.
इगतपुरी तालुका हा मुंबई, नाशिकजवळ असल्याने समाजकंटक युवकांची माथी भडकावण्याचे काम करून राष्ट्रीय हितास बाधा पोहचवत राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू शकतात. त्यामुळे सर्वांनी दक्ष राहून समाज, राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवत उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.