नंदुरबार – नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल भागात आदिवासी संस्कृती जोपासत गावपातळीवर ग्रामस्थांनी विकासाची धरलेली कास वाखाणण्याजोगी असल्याचे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने व्यक्त केले. नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तीन गावांना भेट देवून या गावातील विकास योजनांची माहिती सोनाली कुलकर्णीने घेतली. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘अप्सरा आली’ गाण्याने वेड लावलेली अप्सरा प्रत्यक्षात आपल्या गावात आल्याने तिला पाहण्यासाठी तीनही गावांमध्ये मोठी गर्दी झाली होती.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातंर्गत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मंगळवारी नंदुरबार जिल्हा दौरा केला. सकाळच्या सत्रात सोनालीने नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर या आदिवासीबहुल गावाला भेट दिली. यावेळी सोनालीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. पारंपरिक आदिवासी बैलनृत्य, लहान मुलांनी खास पेहराव करत लेझिमच्या तालावर बैलगाडीवर बसवून सोनालीची मिरवणूक काढली. यावेळी सोनालीच्या हस्ते श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या सोलर युनिटचे उदघाटन करण्यात आले. तसेच व्यायाम शाळा , सखी प्रेरणा भवन यांना भेट देत या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी आदिवासी संस्कृतीप्रमाणे कोकणी महिलांच्या पेहरावाचे प्रतिक असलेले पडकी देवून सोनालीचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिबली डोक्यावर घेवून नाचतांना सोनालीचा आनंद द्विगुणीत झाल्याचे पहायला मिळाले. सोनालीने चिमुकल्यांबरोबर लेझिमवर ताल धरला.
दुपार सत्रात सोनालीने शहादा तालुक्यातील जयनगर येथे भेट दिली. यावेळी जीपमधून सोनालीची मिरवणूक काढण्यात आली. गावातील विविध उपक्रमांचे कौतुक करत सोनालीने गावात सुरु असलेल्या ड्रोनदिदी सारख्या उपक्रमांची माहिती घेतली. सायंकाळी शहादा तालुक्यातील बामखेडा गावाला भेट दिली. बामखेड्यातही सोनालीची बैलगाडीवरुन मिरवणूक काढण्यात आली. गावातील जलजीवन मिशन, गोबर्धन प्रकल्प, आभ्यासिका अशा विविध विकास प्रकल्पांना भेट देत पाहणी केली. या गावखेड्यांवर सोनाली कुलकर्णी आपले स्टारडम विसरुन चांगलीच रमली.
भेट दिलेल्या तीनही गावांमधील भाषणात सोनालीने गावखेड्यात सुरु असलेल्य विकास प्रकल्पांचे कौतूक केले. गावकऱ्यांनी लोकसभागातून गावात जे जमवले, कमवले, मिळवले, ते पाहण्याची मुंबईहुन येवून संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गावखेड्यांसाठी एक संधी आहे. यानिमित्ताने या स्पर्धेचा भाग होवून गावात विकासाचे उपक्रम राबवू शकत असल्याचे मत मांडले. विकास कामे तळागाळापर्यत पोहचत आहेत की नाही, हे प्रत्यक्षात जाणून घेण्याची या दौऱ्यातून संधी मिळाल्याचे सोनालीने सांगितले. लोक एकत्र येवून आदर्श गाव निर्माण करीत असल्याबद्दल सोनालीने समाधान व्यक्त केले. कुठल्याही गाव समाजाचा विकास एकांगी होत नाही. शासन प्रशासन किंवा विविध समाजाच्या लोकांनी विकासाच्या पथावर काम केले, तरच गावांचा विकास होईल. या अभियानातंर्गत उर्वरीत तीन महिन्यात विकासाचा वेग वाढविण्याचे आवाहनही सोनालीने केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसूरकर यांच्यासह इतर अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच उपस्थित होते.
