पुणे येथे दरवर्षी भरणाऱ्या पिफ म्हणजेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा नाशिकच्या दिग्दर्शिका कविता दातीर यांच्या ‘गिरकी’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. वर्षभरात तयार झालेल्या मराठी चित्रपटांपैकी केवळ सर्वोत्तम सात चित्रपट या महोत्सवात स्पर्धेसाठी निवडले जातात. गिरकी त्यापैकी एक आहे.
हेही वाचा >>>जळगाव : तीनशे रुपयांचा मोह अन् तलाठी जाळ्यात
यंदाचे पिफचे २१ वे वर्ष असून दोन ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. महोत्सवात होणाऱ्या विविध सत्रांमध्ये राहुल रवैल, अरुणा राजे या दिग्दर्शकांसह जॉनी लिव्हर, विद्या बालन आदी कलाकारही सहभागी होणार आहेत. गिरकी हा ९५ मिनिटांचा चित्रपट असून त्याच्या लेखन आणि दिग्दर्शनाची बाजू दातीर यांनी सांभाळली आहे. यापूर्वी २०१४ साली कविता दातीर यांनी बबई या लघुपटाची निर्मिती केली होती. त्या लघुपटाचे जगभरातील चाळीसहून अधिक महोत्सवात प्रदर्शन करण्यात आले होते. अनेक महोत्सवात पुरस्कारही मिळाले. तेलंगण राज्यातील ‘टूवर्ड्स अ वर्ल्ड ऑफ इक्वल्स : अ बायालिंग्वल टेक्स्टबुक ऑन जेंडर’ या पदवी व अभियांत्रिकीच्या शासकीय महाविद्यालयांच्या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘बबई’ या लघुपटाचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>जळगावात उद्यापासून महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
चित्रपट क्षेत्राबरोबरच कविता दातीर या कवयित्री देखील आहेत. त्यांचा ‘कविताच्या कविता’ या नावाचा पहिला कविता संग्रह २०१३ साली अक्षर मानवकडून प्रकाशनाकडून प्रकाशित झाला. ‘काळोख उलटून टाकताना’ या नावाचा आगामी कविता संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.
कविता दातीर या नाशिक येथील मा. रा. सारडा कन्या विद्यालय या शाळेच्या तसेच के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. कविता यांच्यासोबत त्यांचे वडील भगवान दातीर यांनी देखील गिरकी चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भगवान दातीर हे नाशिक येथील रहिवासी असून ते पंजाब नॅशनल बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.