नाशिक : शासन दरबारी मराठी भाषेचा आतापर्यंत गांभीर्याने विचार झाला नव्हता, हा आपला अनुभव आहे. हिंदीप्रमाणे मराठीलाही राष्ट्रीय स्तर मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. भाषा प्रवाहात आणि शुद्ध राहिली पाहिजे. मराठी भाषेचा केवळ राजकारणासाठी वापर होऊ नये, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली.

येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयातील प्रांगणात शुक्रवारपासून विश्व मराठी संमेलन प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या पूर्वदिनी महाकवी कालिदास कलामंदिरात बोली भाषांचा महोत्सव या कार्यक्रमाचे उदघाटन मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. कर्णिक यांनी, मराठी बिघडत असल्याची खंत व्यक्त केली. मराठी भाषेचा शुद्धपणा टिकवला पाहिजे. बोली भाषेला श्रीमंती आणणे, लिहिते करणे मोठे काम आहे. मराठी मोठी करणे आवश्यक आहे. बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. बोली भाषांनी मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न केले आहे, असे कर्णिक यांनी सांगितले. महाराष्ट्र हे साहित्य, कला, संगीताला महत्व देणारे राज्य आहे. हजारो वर्षांपासून बोली भाषा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या आहेत. बोली भाषेला महत्व दिले, तर मराठी भाषा समृद्ध होईल. राज्य शासनाने सुरू केलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विकास विभागाचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. मिलिंद जोशी, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

यावेळी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. श्रीपाद जोशी यांनी, बोली भाषांना संजीवनी मिळाल्यास मराठी ही ज्ञानभाषा होईल, असे सांगितले. बोली भाषांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी लागेल. आठवीच्या वर्गापासून भाषा विज्ञान शिकवावे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचे नाशिक हे साहित्य तीर्थ आहे. बोली भाषांचे महत्व नाकारून चालणार नाही. बोली भाषा या मराठी भाषेसाठी जीवनवाहिन्या असल्याचे सांगितले.

दरम्यान ,बोली भाषा महोत्सवाच्या पहिल्या सत्रात जळगाव येथील परिवर्तन संस्थेचे शंभू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहिणाबाईंची गाणी आणि कविता यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम सादर केला. दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.