नाशिक : येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारीख व स्थळात बदल झाला असून आता हे संमेलन ३ ते ५ डिसेंबर या दरम्यान आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीत होणार आहे.

याबाबतची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या मार्चमध्ये गोखले शिक्षण संस्थेच्या आवारात हे संमेलन होणार होते. करोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने ते स्थगित करण्यात आले. जिल्ह्यासह राज्यात करोना नियंत्रणात येत असल्याने संमेलन घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. याबाबत लोकहितवादी मंडळाने साहित्य महामंडळ व संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी चर्चा करत संमेलनाच्या तारखा निश्चित केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

तारखांबाबत साहित्य महामंडळाशी वाद नसल्याचा दावा जातेगावकर यांनी केला. नोव्हेंबरमध्ये संमेलन घेण्यासाठी महामंडळ आग्रही होते. मात्र संमेलनाध्यक्षांची प्रकृती तसेच तयारीसाठी मिळणारा वेळ पाहता डिसेंबरवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे ते म्हणाले.

संमेलनस्थळात बदल करण्यात आला असून आता हे संमेलन स्वागताध्यक्ष भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेत होणार आहे. करोना  र्निबध लक्षात घेऊन संमेलन, विविध कार्यक्रम बंदिस्त सभागृहांत व्हावे यादृष्टीने पर्याय शोधण्यात आले. आधीच्या  स्थळी वाहनतळाची अडचण होती. शहरामधील वाहतुकीला अडचण न होता व संमेलनात आटोपशीरपणा यावा, सर्व पाहुण्यांची निवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी व्हावी तसेच ग्रंथ प्रदर्शन, विविध कला प्रदर्शने, वाहनतळ सुविधा, येणे-जाणे सुकर होईल याचा विचार करून भुजबळ नॉलेज सिटी परिसर संमेलन स्थळ म्हणून निश्चित करण्यात आल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.

३  डिसेंबर :

ल्ल सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथ िदडी. संमेलनस्थळी िदडी पोहोचल्यावर सकाळी ११ वाजता ध्वजारोहण. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच संमेलनाचे उद्घाटन. निमंत्रित कवींचे संमेलन रात्री.

४ डिसेंबर : 

ल्ल सकाळच्या सत्रात ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार आणि प्रकट मुलाखत आणि ज्येष्ठ लेखक व नाटककार मनोहर शहाणे यांचा गौरव. सकाळी ११ वाजता दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन

 ल्ल स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक यावर परिचर्चा. तसेच कथाकथन आणि करोनानंतरचे अर्थकारण आणि मराठी साहित्य व्यवहार, मराठी नाटक एक पाऊल पुढे दोन पावले मागे, शेतकऱ्यांची दु:स्थिती, ऑनलाइन वाचन- वाङ्मय विकासाला तारक की मारक, साहित्यनिर्मितीच्या कार्यशाळा गरज की थोतांड आदी कार्यक्रम होतील.