चारूशीला कुलकर्णी

नाशिक : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. कामाच्या शोधात गावातील मुख्य बाजार पेठेतील जागा पकडत कुटूंब कबिल्यासह उभं राहायचं. काम मिळालं तर ठिक नाही तर काम मिळेपर्यंत तिथेच थांबायचं. कारण या ठिकाणाहून मिळणाऱ्या रोजीरोटीवरच पावसाळय़ातील घरचे गणित अवलंबून. कामाची शाश्वती नसली तरी २० हजाराहून अधिक मजूर बाजारात रोज नव्या उमेदीने उभे राहतात. नाशिकच्या गिरणारे परिसरात भरणाऱ्या मजूर बाजाराची गोष्टच वेगळी.

  नाशिकपासून १०  किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या गिरणारे गावात मजुरांचा बाजार भरतो. गिरणारे गावाजवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा परिसरासह गुजरात सीमारेषेवरील गावातूनही मजूर मोठय़ा प्रमाणावर या ठिकाणी येतात. सर्वाधिक पावसाचा परिसर असला तरी शेती हा येथील प्रमुख व्यवसाय. पावसाचे पाणी संपले की शेतीची कामे थांबतात. मग वर्षभरासाठी दाणा-पाणी जमविण्यासाठी धडपड सुरु होते. घरातील लहान तसेच वयस्कर मंडळी वगळता, सर्वच पाण्याच्या तसेच नोकरीच्या शोधात निघतात. रोजंदारीवर किंवा दोन ते तीन महिन्याच्या, कधी वर्षांच्या करारावर काम शोधत राहतात. गिरणारे येथील मजूर बाजार काम मिळण्याचे एकमेव ठिकाण. या ठिकाणी बाजार वर्षभर भरत असला तरी मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे.

खेडोपाडय़ातून येणाऱ्या मजुरांना या ठिकाणी उन्हातान्हात, पावसात उभे राहवे लागते. त्यांच्यासाठी कुठलेही शेड नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.   शौचालय किंवा अन्य व्यवस्था नाही. मजुरी मिळविण्यासाठी कुटूंबच्या कुटूंब ज्या वेळी या ठिकाणी येतात. तेव्हा जवळ असलेल्या शिदोरीवर त्यांची जेवणाची व्यवस्था होते. घरून निघतांना कोरडा शिधा, लाकूडफाटा सोबत ठेवतात. या शिदोरीवर काम मिळेपर्यंत त्यांना अवलंबून रहावे लागते. या ठिकाणी स्थलांतरीत मजुरांचे प्रमाण अधिक. ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून हा मजुरांचा बाजार भरत आला आहे. या बाजारात येणाऱ्या मजुरांचे ठेकेदार ठरलेले असतात. जे नवखे आहेत. ते स्वत: काम शोधण्यासाठी बाजारात फिरतात. 

कामगार असंघटित असल्यामुळे त्यांना सुरक्षितता नाही. विमा नाही किंवा आरोग्य सुविधा नाही. कामाच्या ठिकाणी अपघात घडला तर यांना कसलीच हमी नाही. अशा धोकादायक वातावरणात यांची कामे सुरू राहतात. काही वेळा ठराविक रक्कम आगाऊ घेत हे मजूर शेतकऱ्यांच्या घरी कामाला गेल्यावर वेठबिगारासारखी वागणूक दिली जाते. मजुरांना सणावाराला घरी जाऊ दिले जात नाही. कामाच्या वेळेव्यतिरिक्त अखंडपणे त्यांना कामाला जुंपले जाते. या विरोधात जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल झाले आहेत.

कामाची अशी सुरक्षितता नसतांना जे कामाच्या शोधात तेथेच राहतात. त्यांना तेथील वाहनचालकांचा मदतीचा हात पुढे येतो. गावातून गिरणारे येथे येण्यासाठी ३० ते ५० रुपये भाडे असते. काम नसल्यावर पुन्हा घरी परतण्यासाठी भाडे आणायचे कसे, इथे थांबायचे तर जेवणाची व्यवस्था काय, या प्रश्नांला उत्तर म्हणून येथील खासगी प्रवासी टॅक्सी, रिक्षावाले भाडय़ासाठी थांबतात. तुम्हाला काम मिळाले की पैसे द्या, असे सांगत त्यांना घरी सोडले जाते.

याविषयी वाहन चालक गणेश महाले यांनी माहिती दिली. काम मिळेल याची खात्री नसते. गावात मजुराच्या बाजारात यांना राहण्यासाठी व्यवस्था नाही. अशा वेळी माणुसकी म्हणून त्यांचे भाडे घेत नाही. ज्या वेळी काम मिळेल तेव्हा द्या, असे सांगतो. काही जण अर्ध्या भाडय़ात घेऊन जातात, असे महाले यांनी नमूद केले.