नाशिक – सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहत परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या विमा ऑरोमॅटिक्स या कंपनीला बुधवारी दुपारी पावणेबाराच्या अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दुरवरूनही दिसत असून परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळी माळेगाव औद्योगिक वसाहत परिसर आणि सिन्नर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. कंपनीमध्ये अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारी पावडर तयार केली जात असल्याने कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पिंपात रसायन साठवले होते. याच रसायनाच्या पिंपाला आग लागल्याने काही क्षणाच्या आत संपुर्ण कंपनी मध्ये आग पसरली.
कंपनीतील साहित्य व यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. विशेष म्हणजे रसायनाच्या पिंपावर पाणी टाकल्यास आग अधिक भडकत असल्याचे घटनास्थळी दिसत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आग नियंत्रणात येण्यासाठी सिन्नर नगर परिषद, नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. आगीची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असून सिन्नर परिसरातील पाणी वाहून नेणाऱ्या टँकर चालकांना तातडीने पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास जाणवण्यास सुरूवात झाली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचे काम करीत आहेत. मात्र रसायनामुळे आग सतत भडकत असल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास अडचणी येत आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल असून परिसरात वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येत आहे.

