मनमाड : शनिवारी शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीने सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला. इतकी कोंडी होती की, अनेक वाहनधारकांना रस्ता बदलून जावे लागले. मनमाड शहरात वारंवार होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दोन दिवसापूर्वी मनमाड – मालेगाव मार्गावर दहेगाव येथे तीन टँकर आणि मालमोटार यांच्यात झालेल्या विचित्र अपघातामुळे दिवसभर वाहतूक खंडित झाली होती. ही वाहतूक शुक्रवारी कुठे सुरळीत सुरू झालेली असतांना शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास पुन्हा एकदा मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. सुट्टीमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यातच रविवारी महाशिवरात्र उत्सव असल्याने बाजारपेठेसह राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची गर्दी आहे. या काळात दिवसभर वाहतूक कोंडी कायम राहिली. मोठ्या संख्येने वाहने अडकून पडली.

कधी अपघात, कधी अवजड वाहतूक तर कधी गाड्यांमधील तांत्रिक बिघाड यामुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प होत असते. या कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने काही काळ गोंधळ उडाला, रुग्णवाहिका सायरन वाजवून पुढे मार्गस्थ झाली. या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाल्याने वाहनधारकांसह विद्यार्थी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपूल अथवा रिंग रोड करावा, अशी मागणी केली जात आहे.

वाहतूक कोंडीचे कारण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून कन्नड घाटमार्गे अवजड वाहनांची जी वाहतूक सुरू होती, ती आता कन्नड मार्ग घाट मार्गातून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरमार्गे दक्षिण भारतातून येणारी अवजड वाहतूक ही आता मनमाडमार्गे सुरु झाली. त्यात सर्वात जास्त अवजड वाहनांचा समावेश असल्याने मनमाडच्या वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला. ही अवजड वाहने तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडतात. काही वेळा अपघात होतात. त्यामुळे मनमाडकरांना नाहक कोंडीला तोंड द्यावे लागते.

मनमाड शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी, वाहतूक कोंडीचा उद्योग व्यापारी उदीमावर परिणाम होत आहे. कोंडीमुळे ग्राहक बाजारपेठेत खरेदीला येत नाही. त्याचा शहराच्या व्यापार उदीमावर परिणाम होतो. अवजड वाहनांमुळे अपघातही वाढले असून राष्ट्रीय महामार्गावरून दिवसा अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करावी. – राजाभाऊ पारिक (अध्यक्ष व्यापारी महासंघ, मनमाड)