नियमनमुक्ती निषेधार्थ माथाडी कामगारांचा आज संप; नाशिकमधील बाजार समित्या बंद

बाजार समित्यांमध्ये व्यापारी, अडत्या यांच्याकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड कायम करण्यात येते.

बाजार समित्या नियमनमुक्त करून शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विक्री करण्याची मुभा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्याविषयी विभिन्न प्रतिक्रिया उमटत असतानाच जिल्ह्य़ातील माथाडी कामगारांनी या निर्णयाच्या निषेधार्थ चार जुलै रोजी लाक्षणिक संप पुकारल्याने सोमवारी जिल्ह्य़ातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार आहे.

बाजार समित्यांमध्ये व्यापारी, अडत्या यांच्याकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड कायम करण्यात येते. शेतकऱ्यांकडून कमी भावात फळे, भाजीपाल्याची खरेदी करून ग्राहकांना शेतमाल दुप्पट, तिप्पट दराने विकून ही मंडळी भरमसाठ नफा कमवितात, असा आक्षेप घेतला जातो. शिवाय शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन त्याची साठवणूक करत ज्यावेळी टंचाई निर्माण होते, त्यावेळी साठविलेल्या मालाची विक्री करून व्यापारी नफा कमवितात, अशी टीका केली जाते. व्यापारी, अडते, माथाडी कामगार आणि शेतकरी यांच्यात वारंवार होणाऱ्या वादामुळे कधी शेतकऱ्यांनी, तर कधी व्यापारी, अडत्यांनी खरेदी-विक्रीच्या कामावर बहिष्कार टाकण्याचे प्रकार घडत असतात. यास पर्याय म्हणून अलीकडेच राज्य शासनाने बाजार समित्या नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना जिल्ह्य़ातील माथाडी कामगारांनी त्याविरोधात आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे बाजार समित्यांमध्ये कार्यरत परवानाधारक माथाडी कामगारांची उपासमार होणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा माथाडी कामगार संघटनेचे सचिव सुनील यादव यांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाचे नोंदणीकृत कामगारांना या निर्णयामुळे मजुरीपासून दूर राहावे लागणार असल्याने आमच्या कामाची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयास विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात जिल्ह्य़ातील सर्व बाजार समित्या तसेच उपसमित्यांमधील सुमारे पाच हजार माथाडी कामगार सोमवारी कामकाजात सहभाग घेणार नसल्याचे यादव यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सर्व बाजार समित्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांनी सोमवारी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये, असे आवाहन नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी केले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mathadi workers strike in nashik

ताज्या बातम्या