अपघात रोखण्यासाठी डॉ. भारती पवार यांचे निर्देश ; वर्षभरात १३६३ अपघातांत ७८८ जणांचा मृत्यू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : राज्यात सर्वाधिक अपघात होणाऱ्या जिल्ह्यांत नाशिकचा समावेश आहे. नाशिकची अशी ओळख होणे योग्य नसून वारंवार अपघात होणारी जिल्ह्यातील १३० अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट) निश्चित करण्यात आली आहेत. या क्षेत्रात अपघात रोखण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपायांवर तातडीने काम सुरू करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त समिती नेमून नियमित आढावा घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

मंगळवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण डी,, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. २०२१ या वर्षांत जिल्ह्यातील विविध मार्गावर एकूण १३६३ अपघात झाले. त्यात ७८८ जणांना प्राण गमवावे लागले. तर ५२८ जण गंभीर जखमी झाले. चालू वर्षांचा विचार केल्यास २२ मे २०२२ पर्यंत काही मार्गावर अपघाताचे प्रमाण कमी झाले असले तरी जव्हार-धरमपूर मार्गावर मात्र त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. घाट मार्गाच्या या रस्त्यावर अपघात प्रवण क्षेत्राची जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यांच्या मदतीने उपाय केले जात असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी नमूद केले.

अपघातांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. वाहनांचा वेग हे त्याचे एक कारण आहे. वाहनधारकांकडून वेग मर्यादेचे पालन होत नसल्याने अपघात होतात. यंत्रणा अशा वाहनांवर अधुनमधून कारवाई करतात. गेल्या वर्षभरात एक हजार वाहनधारकांवर कारवाई केली गेली. पण अनेक मार्गावर वेग मर्यादेचे फलक नाहीत. त्यामुळे यासंबंधीचे फलक तातडीने लावण्याची सूचना डॉ. पवार यांनी केली. महामार्गालगतच्या गावांकडून गतिरोधकाची मागणी वा वाहतूक सुरक्षेसाठी काही मुद्दे मांडले जातात. त्यांचे यंत्रणांनी वेळीच निराकरण करायला हवे. वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. अपघातप्रवण क्षेत्रात धोक्याचा इशारा देणारे फलक बसवावेत, असे त्यांनी सूचित केले. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी अल्पकालीन, दीर्घकालीन उपायांवर प्रभावी काम व्हायला हवे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने उपायांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. या उपायांची परिणामकारकता पुढील काळात जाणून घेतली जाईल. या प्रश्नात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही डॉ. पवार यांनी दिला.

अपघात कुठे, किती?

२०२१ या वर्षांत जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर सर्वाधिक १६२, नाशिक-पुणे मार्गावर २८ आणि नाशिक-जव्हार मार्गावर २६ अपघात झाले. अपघातप्रवण क्षेत्रात उपाय योजले जात असल्याने २२ मे २०२२ पर्यंत म्हणजे या वर्षी साडेपाच महिन्यांचा  विचार केल्यास मुंबई-आग्रा महामार्गावर ५७, नाशिक-पुणे रस्त्यावर १५ अपघात झाले. नाशिक-जव्हार रस्त्यावरील जव्हार-धरमपूर मार्गावर अपघातांची संख्या २४ म्हणजे लक्षणीय वाढली. घाट मार्गातील हा रस्ता असून अपघातप्रवण क्षेत्रात वन विभागाच्या मदतीने उपाय योजले जात असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समिती गठीत होणार

जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी ही चिंतेची बाब आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची समिती स्थापन करावी. या समितीने अपघातप्रवण क्षेत्रातील अल्पकालीन व दीर्घकालीन उपायांवर लक्ष केंद्रित करावे. महामार्गावर वेग मर्यादेचे फलक उभारावेत. वाहनचालकाची दृष्टी तपासणी महत्वाची आहे. दीर्घकालीनमध्ये सेवा रस्ता, उड्डाण पुलाबाबतच्या सूचनांवर काम केले जाईल. 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measures on 130 black spots in nashik district to prevent accidents zws
First published on: 25-05-2022 at 00:21 IST