मालेगाव : मालेगाव शहरात सामाजिक सलोखा, धार्मिक सौहार्द आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २०२६ या वर्षात प्रजासत्ताक दिनासह इतर ११ महत्वाच्या राष्ट्रीय आणि सामाजिक सण-उत्सवांच्या दिवशी शहरात ‘नो-स्लॉटर डे’ पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या कालावधीत सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने २४ तास पूर्णतः बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने, किरकोळ म्हैसवर्गीय, बीफ, बकरा, कोंबडी आणि इतर सर्व प्रकारची मांस विक्री दुकाने जाहीर करण्यात आलेल्या दिवशी बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित दुकानदार व कत्तलखाने मालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
नो-स्लॉटर’ दिवसांची यादी
महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार खालील दिवशी मांस विक्री बंद पाळण्यास बजावण्यात आले आहे. २६ जानेवारी – गणतंत्र दिवस, २६ मार्च – श्रीराम नवमी, ३१ मार्च – भगवान महावीर जयंती, १ मे – बुद्ध पौर्णिमा,१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिवस, ४ सप्टेंबर -श्रीकृष्ण जयंती, ८ सप्टेंबर -जैन पर्युषण दिवस, १५ सप्टेंबर – जैन संवत्सरी, २५ सप्टेंबर -अनंत चतुर्दशी, २ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती, ४ ऑक्टोबर – जागतिक प्राणी दिवस,२५ नोव्हेंबर – टी. एल. वासवानी जयंती.
नियम मोडणे महागात पडणार!
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनातर्फे आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरातील चारही प्रभाग कार्यालयांमधील प्रभाग अधिकारी आणि बीट मुकादम यांच्यामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यावसायिकाने या आदेशाचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात फौजदारी खटला, दंड व व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणे यासारखी कारवाई होऊ शकते.
केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा सर्व संबंधितांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन मालेगाव महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या परिणामांना व्यावसायिक स्वतः जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
