धुळे : शहरात नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जवळपास एक हजार ११८ पदे उपलब्ध झाली आहेत. दहावी पास किंवा नापास, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर, इंजिनिअरिंग, फार्मसी तसेच कृषी विषयातील विविध पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही दिलासादायक आणि महत्त्वाची संधी आहे.

येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शिक्षण विद्यावर्धिनी सभेचे डॉ. एम. वाय. वैद्य कला, प्रा. पी. डी. दलाल वाणिज्य व डॉ. डी. एस. शाह विज्ञान महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

साक्री रोडवरील शिक्षण विद्यावर्धिनी सभेच्या महाविद्यालयीन संकुलात सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत हा रोजगार मेळावा पार पडणार आहे.  या मेळाव्यात जवळपास एक हजार ११८ रिक्त पदे उपलब्ध असून यासाठी सुमारे ३० नामांकित कंपन्या व आस्थापनांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत.

नामांकित कंपन्या

या रोजगार मेळाव्यात डिस्टिल एज्युकेशन ॲड टेक्नॉलॉजी, युवाशक्ती फाउंडेशन, बॉश लिमिटेड, नवभारत फर्टिलायझर लिमिटेड, यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल, फ्युजन मायक्रो फायनान्स, जैन इरिगेशन सिस्टिम्स, स्वातंत्र्य फायनान्स, क्रिस्टल रिक्रुटमेंट सोल्युशन, गोविंद एच. आर. सर्व्हिसेस, स्विगी, अमोल एच. आर. सोल्युशन, इन्स्टर इंडिया, सनलाईन फोटोव्होल्टेईक टेक्नॉलॉजी, ओरियन रोप्स, सेवा ऑटोमोटिव्ह, नवकार लक्साईल, नवकार हिरो, नवकार हुंडई, आकाश ऑटोमोटिव्ह, आयपीएस इंटिग्रेटेड पर्सनल सर्व्हिसेस, मन वाहन ऑनलाईन राईड बुकिंग, अलट्रस्ट टेक्नॉलॉजी, सक्सेस एच. आर. सोल्युशन्स, ग्लोबल ऑटोव्हील्स, श्रीनिवास इंटरप्रायझेस, मेडप्लस आदी कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

उत्पादन, सेवा, वित्त, शिक्षण, वाहन उद्योग, फार्मसी, कृषी, लॉजिस्टिक, आयटी व कौशल्याधारित विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. मेळाव्यात रोजगाराबरोबरच कौशल्य विकास, स्वयंरोजगार, अर्थसहाय्य योजना, स्टार्टअप, प्रशिक्षण संस्था याबाबत माहिती देण्यासाठी विविध महामंडळांचे मार्गदर्शन स्टॉल्सही उपलब्ध असणार आहेत. पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन काही पदांसाठी जागेवरच निवड केली जाणार असल्याने युवक-युवतींसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

रोजगार इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या छायाप्रती संचासह गुरुवार (दि. ५) सकाळी १० वाजेपर्यंत शिक्षण विद्यावर्धिनी सभेच्या महाविद्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त चंद्रकांत दुसाने यांनी केले आहे. काही अडचण असल्यास कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५६२-२९५३४१ वर संपर्क साधण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.