scorecardresearch

पुरूषांना त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यातून दर्शन कायम

त्र्यंबकेश्वर देवस्थानने गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास पुरूषांवर टाकलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेतला.

विश्वस्त मंडळाचा निर्णय
त्र्यंबकेश्वर देवस्थानने गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास पुरूषांवर टाकलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेतला.
शनिशिगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन महिलांना दर्शन करू देण्याचा वाद एकिकडे मिटला असताना त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या गाभाऱ्यात जाऊन महिलांना दर्शन करू न देण्याचा वाद कायम आहे. महिलांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी असताना त्र्यंबकेश्वर देवस्थानने तीन एप्रिल रोजी बैठक घेत पुरूषांवरही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी टाकली होती. देवस्थानच्या या निर्णयास नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी देवस्थानची रविवारी बैठक झाली. देवस्थानचे अध्यक्षा व जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी यांच्या अनुपस्थितीत सचिव निवृत्ती नागरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तीन एप्रिल रोजीच्या बैठकीतील ठरावांची अमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन एप्रिलआधी मंदिरातील दर्शनासंदर्भात सुरू असलेली परंपरा व पद्धत यापुढेही तशीच सुरू ठेवण्याचे ठरविण्यात आले. याचाच अर्थ पुरूषांवर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास असलेली बंदी मागे घेण्यात आली आहे. तसेच पुरातत्व विभागाने ठरवून दिलेल्या सूचना विचारात घेऊन गाभऱ्यात जाऊन दर्शनासाठी सकाळी सहा ते सात ही वेळ ठरविण्यात आली. बैठकीस यादवराव तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, जयंत शिखरे, सचिन पाचोरकर, ललिता शिंदे, अ‍ॅड. श्रीकांत गायधनी आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-04-2016 at 00:16 IST

संबंधित बातम्या